होणार ग्राहक- विक्रेत्यांचा ‘समुत्कर्ष’
पुणे -कोथरूड मध्ये ग्राहक आणि विक्रेत्यांच्या नात्याचा नवा धागा गुंफला जात असून, ग्राहक आणि विक्रेते यांचा समान उत्कर्ष व्हावा; या उद्देशाने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून नवीन ‘समुत्कर्ष’ ग्राहक पेठेची मुहूर्तमेढ आज रोवण्यात आली. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर ही संस्था काम करणार असून, या मध्ये किरणा सामानासह महिला बचत गटांच्या उत्पादनांना ही व्यासपीठ मिळणार आहे.
पुणे शहराला ग्राहक चळवळीची एक वेगळी परंपरा आहे. ग्राहकांचे हित समोर ठेवून; अनेक चळवळी पुण्यात काम करत आहेत. या चळवळीमुळे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर जीवनावश्यक वस्तू रास्त दरांत, उत्तम दर्जाच्या वस्तू घरपोच पुरवणारी वितरण व्यवस्था सुरू झाली आणि हा वृक्ष बहरू लागला. यामुळे ग्राहकांच्या हिताचे रक्षण होण्यास मदत झाली. आता या शृंखलेत कोथरुड मध्ये आणखी एक पान जोडले जात असून; नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘समुत्कर्ष’ नव्या ग्राहक पेठेची मुहूर्तमेढ आज रोवण्यात आली.यावेळी माजी आमदार दीपक पायगुडे, भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, हर्षाली माथवड, नवनाथ जाधव, दिनेश माथवड, वनिता काळे, समुत्कर्ष फाऊंडेशनचे धनंजय रसाळ, पार्थ मठकरी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
या पेठेत २० टक्के सवलतीच्या दरात धान्य आणि मिठाई खरेदी करता येणार आहे. यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची रास्त किमतीत विक्री होणार आहे. त्यासोबतच महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना विक्रीसाठी हक्काचे एक व्यासपीठ मिळणार आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे या उपक्रमाला एक वैचारिक बैठक असून, इथे छोट्या उत्पादकांना त्यांची दर्जेदार उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे. तसेच, महिला बचत गटांना उचित प्रथा पाळूनही उत्तम व्यवसाय करता येतो ह्याची शिकवण मिळणार आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बलांसाठी मनी सेव इज मनी अर्न्ड हे अतिशय महत्त्वाचे सूत्र आहे. त्यामुळे त्यांची बचत व्हावी, आणि चांगल्या दर्जाच्या वस्तू आणि उत्पादने रास्त भावात मिळावेत हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे कोथरूड मध्ये ‘ना नफा ना तोटा’ धर्तीवर ही चळवळ उभी राहत आहे. यातून ग्राहकांचे हित जपले जाणार असून; महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणार आहे, अशी भावना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.