पुणे:नाभिक समाज हा समाजाच्या प्रत्येक घटकांशी जोडलेला आहे. त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहे, अशी ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली. पुणे शहर नाभिक समाज मंडळी या संस्थेच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन कर्वेनगर येथे करण्यात आले होते. याप्रसंगी नामदार चंद्रकांत दादा पाटील बोलत होते.
यावेळी भाजप कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप बुटाला पुणे शहर उपाध्यक्ष श्री प्रशांत हरसुले, मंजुश्री खर्डेकर, अल्पना वर्पे, नवनाथ जाधव, गणेश वरपे, गिरीश खत्री, प्रकाश बालवडकर, दत्तात्रेय चौधरी; त्याचप्रमाणे मारुती आढाव ,दिनकर चौधरी ,बाळकृष्ण निढाळकर आणि समाज बांधव भगिनी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, श्री संत सेना महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य नाभिक समाजाच्या विकासासाठी समर्पित केलं. त्यांनी आपल्या अभंगवाणीतून समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांचे विचार पुढील पीढीत प्रवाहित करुन, समाजाचा सर्वांगीण विकास करणं, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. शासनाने नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत. समाज बांधवांना विशेष करुन तरुणांना व्यवसायाचे धडे देऊन; त्यांना स्वावलंबी बनवले जात आहे. त्यामुळे व्यवसायिक वृद्धीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी यानिमित्ताने दिली.
दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला म्हणाले की, नाभिक समाज हा आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे. समाजाच्या विकासात नेहमीच त्यांचे योगदान राहिले आहे. तसेच, समाजासाठी समर्पित होऊन काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठिशी नाभिक समाज सदैव राहिला आहे. भारतीय जनता पक्ष आणि नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे समाजाच्या प्रत्येक घटकासाठीचे काम असते. त्यामुळे नाभिक समाज हा अशा पक्षाला आणि व्यक्तींच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
प्रशांत हरसुले म्हणाले की, चंद्रकांतदादांनी समाजासाठी त्यांच कर्तव्य पार पाडण्याची ग्वाही आपल्याला दिली आहे. आता यापुढील काळात समाज बांधवांनी देखील दादांचे सेवा कार्य समाजामध्ये पोचवलं पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त केली.