पुणे- भ्रष्टाचाराचा चेहरा उघडा पडला!महाराज येत्या निवडणुकीत भ्रष्टाचाराची वाळवी साफ करू असे सांगत कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बाणेर या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला नमन करत सिंधुदुर्ग या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. राष्ट्रवादीचे अर्बन सेल चे शहर प्रमुख स्वप्नील दुधाने यांच्या नेतृत्वाखाली येथे निदर्शने करत महायुती सरकारच्या कारभाराचा धिक्क्कर करण्यात आला .
दुधाने म्हणाले,’ सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासोबत घडलेली घटना अत्यंत क्लेशदायक आणि चीड आणणारी होती. या ठिकाणी पुतळ्याच्या माध्यमातून भ्रष्ट राजकारणाचे पितळ उघडे पडले असून या प्रकरणात सहभागी सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवरायांचा अपमान हा स्वाभिमानी महाराष्ट्र कदापि सहन करणार नसून भविष्यात यावर लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला.येत्या निवडणुकीत महाराष्ट्राला लागलेली ही भ्रष्टाचाराची वाळवी साफ करून पुनःश्च छत्रपती शिवरायांची पावन भूमी ही ओळख मिळवून देण्यासाठी नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले आणि आम्ही सदैव त्यांच्यासोबत असू, असा विश्वास दिला.