लातूर -राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सरकारवर चौफेर टीकेची झोड उठली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंबंधी जनतेची माफी मागत दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला. पण या प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी राज्यातील 13 कोटी जनतेची माफी मागतो, असे ते म्हणालेत.
अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा बुधवारी लातूर येथे पोहोचली. तिथे आयोजित एका सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वेगवान वाऱ्यामुळे पडला. या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी राज्यातील 13 कोटी जनतेची माफी मागतो. तसेच या दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाहीही देतो. सदर पुतळ्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे होते. कारण, हे सर्व लोक राष्ट्रनिर्मिती करण्यात अग्रेसर होते. त्यांचे विचार कायमच आपणास प्रेरणा देत असतात. त्यामुळे अशी चूक भविष्यात पुन्हा होणार नाही असा शब्द मी देतो.
अजित पवार पुढे म्हणाले की, मी केव्हाही विरोधकांवर टीका केली नाही. कारण, आम्ही कामाची माणसे आहोत. आम्ही 15 हजार कोटींचे विज बील माफ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. आता त्यांना केवळ शेतातील मोटार चालू करायची आहे. वीज बिलाच्या थकबाकीचा त्यांना कोणताही विचार करायचा नाही.
आपल्या राज्याचे बजेट साडे 6 लाख कोटी रुपयांचे आहे. त्यातून आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी वेगळे पैसे काढले. या योजनेची राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना भविष्यातही सुरू राहील.
अजित पवार यांनी यावेळी बदलापूर येथील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेवरही दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, बदलापूर येथील घटना दुःखद आहे. सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. महिला सुरक्षेला आमचे कायमच प्राधान्य आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांतील दोषींना फाशी व जन्मठेप सुनावण्यात येईल. अशी विकृती पुन्हा कुणीही करू नये यासाठी संबंधित कायदे आणखी कठोर केले जातील. या प्रकरणी कोणतीही हयगय केली जाणार नाही. विशेषतः कुणी हयगय केली तर त्याला तुरुंगात डांबण्यात येईल.