सिंधुदुर्ग-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या 8 महिन्यांतच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी एका दिमाखदार कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा एकूण 43 फूट उंच होता. त्यात जमिनीपासून बांधकाम 15 फूट चबुतरा, तर त्यावर 28 फूट उंचीचा पुतळा उभा होता. हा भव्य पुतळा सोमवारी दुपारी अचानक कोसळला.
नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट नाही. महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. नौदल दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या कामाबद्दल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुरुवातीपासून चौकशीची मागणी केली होती. या झालेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
पुतळ्यासाठी केली होती 5 कोटींची तरतूद
छत्रपती शिवाजी महाराज यांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय नौदलानेही आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भव्य समारंभात छत्रपतींच्या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. राजकोट येथील शिवपुतळा संकुलाचे सुशोभीकरण व इतर व्यवस्थापनासाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या कार्यालयाने तब्बल 5 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर राज्य सरकार व नौदल विभागाच्या परवानगीनंतर या पुतळ्याचे बांधकाम सुरू झाले होते. पण आता हा पुतळा पडल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
कसा होता मालवण येथील शिवाजी महाराज पुतळा?
किल्ले राजकोट परिसराचं सुशोभीकरण तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जमिनीपासून उंची सुमारे 43 फूट एवढी आहे
बांधकाम जमिनीपासून 15 फूट तर त्यावर 28 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असं स्ट्रक्चर आहे.
हा पुतळा नौसनेकडून उभारण्यात आला.
ज्याचं उद्घाटन 4 डिसेंबर 2023 रोजी, नौसेना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले.
पुतळ्याची किंमत 2 कोटी 40 लाख 71 हजार एवढी रुपये एवढी होती.
कल्याणचा तरूण शिल्पकार आणि मालवणचा सुपुत्र जयदीप आपटे यांनी हे शिल्प बनवलं आहे.
कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले …
भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आणि मते घेतली. पण सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे.४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त मालवण येथील राजकोट येथे मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज दुपारी कोसळला. निकृष्ठ बांधकामामुळे हा पुतळा कोसळला आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणा-या या लोकांना महाराष्ट्राची जनता कदापी माफ करणार नाही.