पुणे – विदुर पेंढारकर यांनी केलेल्या दुहेरी कामगिरीच्या जोरावर स्काय रेंजर्स संघाने प्रौढांच्या पुणे मास्टर्स टेबल टेनिस लीग स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात त्यांनी स्पार्टन्स संघाला ३-१ असे पराभूत केले.
टॉस अकादमीने आयोजित केलेल्या या स्पर्धेस शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे शारदा समूहाचे प्रायोजकत्व लाभले होते. अंतिम सामन्यातील पहिला लढतीत स्काय रेंजर्स संघाचे नचिकेत देशपांडे यांना उपेंद्र मुळ्ये यांच्याकडून १२-१०, १०-१२,९-११ असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र नंतरच्या दुहेरीत मनोज फडके व विदुर पेंढारकर यांनी स्पार्टन्स संघाच्या शेखर काळे व सुनीत लाल यांचा ११-९,१५-१३ असा पराभव करीत १-१ अशी बरोबरी साधली. पाठोपाठ अनुभवी खेळाडू संतोष वाकराडकर यांनी स्पार्टन्स संघाच्या अभिजीत मिठापल्ली यांना १३-११,११-५ असे पराभूत केले आणि सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. दुहेरीच्या परतीच्या लढतीत पेंढारकर व हरीश साळवी यांनी सुनीत लाल व अविनाश जोशी यांच्यावर ११-७,७-११,११-४ अशी मात केली आणि संघास ३-१ असा विजय मिळवून दिला.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ टेबल टेनिस संघटक दीपेश अभ्यंकर, आशिष बोडस, स्मिता बोडस यांच्या हस्ते झाला.