इन्स्टंट मेसेजिंग आणि कम्युनिटी ॲप टेलीग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव यांना शनिवारी संध्याकाळी पॅरिसच्या बाहेर बोर्जेट विमानतळावर अटक करण्यात आली. फ्रेंच मीडिया रिपोर्ट्सनुसार, डुरोव त्यांच्या खासगी जेटने फ्रान्सला पोहोचले होते.
फ्रेंच पोलिस टेलिग्रामवर सामग्री नियंत्रकांच्या कमतरतेचा तपास करत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नियंत्रकांच्या कमतरतेमुळे, मेसेजिंग ॲपवर गुन्हेगारी क्रियाकलाप बिनदिक्कतपणे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. याप्रकरणी सीईओ दुरोव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सध्या या प्रकरणी टेलिग्रामकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. फ्रान्सच्या गृहमंत्रालयाने किंवा पोलिसांनी कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रश्न केला आहे की पाश्चात्य स्वयंसेवी संस्था (गैरसरकारी संस्था) डुरोवच्या सुटकेची मागणी करतील का.
कधीकाळी ISIS साठी बनले आवडते ॲप
वृत्तानुसार, 2015 च्या पॅरिस हल्ल्यासाठी ISIS ने आपला संदेश देण्यासाठी टेलिग्रामचा वापर केला होता. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पावेल म्हणाले होते की, ‘मला वाटते की, दहशतवादासारख्या वाईट घटनांच्या भीतीपेक्षा गोपनीयतेचा अधिकार महत्त्वाचा आहे.’
ऑक्टोबर 2015 पर्यंत ISIS च्या चॅनेलचे 9 हजार फॉलोअर्स झाले होते. नोव्हेंबर 2015 मध्ये, टेलिग्रामने ISIS प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या 78 चॅनेल ब्लॉक केले.