पुणे : काँग्रेसमध्ये असताना पुण्याचे नेते आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणारे,युती आणि आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले, परंतु दरम्यानच्या काळात राजकीय समीकरणे बदलल्यामुळे भाजपात गेलेले इंदापुरचे हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहे . विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरची जागा विद्यमान आमदार दत्ता भरणे यांनाच जाणार असल्याने हर्षवर्धन पाटील यांना महायुतीत उमेदवारी मिळणार नाही, हे जवळपास निश्चित झाल्याने त्यांनी ‘आपला मार्ग’ आखायला सुरूवात केली आहे असा अंदाज व्यक्त होतो आहे .
कोल्हापूरच्या कागलमध्ये हसन मुश्रीफ विद्यमान आमदार असल्याने तेथे समरजीतसिंह घाटगे यांना विधानसभा निवडणूक लढविण्यास संधी मिळणार नव्हती. त्याचमुळे त्यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला. अगदी तसाच निर्णय हर्षवर्धन पाटील घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महायुतीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची एन्ट्री झाल्यापासून राज्यातली राजकीय समीकरणे पूर्णपणे पालटून गेली आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या महायुतीमधील नेत्यांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. विद्यमान आमदारालाच तिकीट द्यायचे, हा महायुतीचा नियम ठरला असल्याने तेथील अन्य पक्षाच्या नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
हर्षवर्धन पाटील हे राज्यातले ज्येष्ठ नेते. १९९५ सालच्या सेना भाजप युतीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. १९९९ पासून २०१४ पर्यंत त्यांनी इंदापूरचे प्रतिनिधित्व केले. दरम्यानच्या आघाडी सरकारच्या काळात त्यांनी महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली. परंतु आघाडीमधूनच इंदापुरात त्यांना आव्हान दिले जायचे. अजित पवार यांचे निकटवर्तीय, माजी जि.प. अध्यक्ष दत्ता भरणे यांना दादांनी बळ दिले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सगळे पक्ष वेगवेगळे लढल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर उभे असलेले हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. पुढे २०१९ ला आघाडीत विद्यमान आमदार म्हणून भरणे यांनाच तिकीट देण्याचे संकेत आघाडीतील नेत्यांनी दिले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची वाट धरली.भाजपात गेल्यावर … आता आपल्याला शांत झोप लागते असे विधान त्यांचे गाजले होते . आता ते शांत झोपेतून उठून तुतारी खरेच फुंकणार काय ? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.