पुणे: आजाद समाज पक्षाने आयोजित केलेला सर्वधर्म समभाव महामोर्चा बुधवारी अत्यंत यशस्वी ठरला. हजारो नागरिकांनी या मोर्चात सहभाग घेऊन धार्मिक सद्भाव आणि न्यायाची मागणी केली. रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ आणि त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कॅम्प येथील पुतळ्याला वंदन करून झाली. मोर्चेकरांनी 300 फूट लांबीचा भव्य तिरंगा ध्वज फडकावत अभिमानाने मार्गक्रमण केले. डॉ. आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा शांततापूर्ण पद्धतीने पार पडला.
आजाद समाज पक्षाचे राज्य विधी सल्लागार ॲड. तौसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोर्चात सर्व धर्म, जाती आणि समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रामगिरी महाराज यांनी इस्लाम धर्म आणि पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या अपमानजनक वक्तव्यांचा तीव्र निषेध करण्यात आला.
मोर्चास संबोधित करताना ॲड. तौसिफ शेख म्हणाले, “रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करण्यात यावी. सरकारकडून, विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होत असलेली त्यांची पाठराखण अत्यंत निंदनीय आहे. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. शासनाने या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अन्यथा आजाद समाज पक्ष पुढील आंदोलनाची दिशा ठरवेल,” असा एल्गार केला.
मोर्चा शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याबद्दल आणि पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल आजाद समाज पक्षाचे पदाधिकारी ॲड. क्रांती सहाणे यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले. पक्षाच्या वतीने मोर्च्यात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचेही आभार मानण्यात आले.
दरम्यान, आजाद समाज पक्षाने कोलकाता येथील बलात्कार प्रकरण आणि बदलापूर येथील घटनेचाही तीव्र निषेध केला. अशा घटना समाजासाठी कलंक असल्याचे पक्षाने म्हटले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी पक्षाने केली आहे.
या मोर्च्याद्वारे धार्मिक सद्भाव, सामाजिक एकता आणि न्यायाची मागणी करण्यात आली. सर्व धर्म आणि समाजातील लोकांनी एकत्र येऊन शांततेचा संदेश दिला आहे. तसेच समाजातील विघटनकारी शक्तींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. या मोर्च्याने सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले असून, लवकरच कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.