महापालिका, संवाद, पुणे, सातारकर स्टुडिओचा उपक्रम
पुणे : शुक्रवार पेठेतील महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्या निकेतन हायस्कूलमधील 350 विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. 24) श्री गणेशाच्या सुबक मूर्ती साकारल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शाळेमध्ये राबविलेल्या अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे.
पुणे महानगर पालिका, संवाद, पुणे, वर्ल्ड आर्टिस्ट डेव्हलपमेंट फेडरेशन, पुणे, सातारकर स्टुडिओ ऑफ फाईन आर्ट आणि सिने मॉडेल आर्ट स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्या निकेतन हायस्कूलमधील चौथी ते सातवीच्या 350 विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, चित्रकार व शिल्पकार प्रज्ञा सातारकर, प्रसिद्ध शिल्पकार सुरेश राऊत, प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर, हेमंत चिंचवले, सतीश तारू, विजय दीक्षित, महेश मोळवडे, सुप्रिया शिंदे, शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा नाईक, जयवंत बोरसे, विजय दीक्षित, दया लोखंडे, वैभव पिसे, आर्यमा झंवर आदी उपस्थित होते.
सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन झाले. त्यानंतर सुरेश राऊत यांनी मूर्ती कशी साकारायची याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अवघ्या एक तासात सुबक मूर्ती साकारल्या.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राजीव नंदकर म्हणाले, पुस्तकी शिक्षणाबरोबर कलेचे शिक्षण घेताना त्यात एकरूपता असावी. लक्ष केंद्रीत करून कला आत्मसात केल्यास यश नक्की मिळते. ज्या कलेत रुची आहे, ती कला जोपासल्यास जीवन समृद्ध होते.
कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडताना प्रज्ञा सातारकर म्हणाल्या, खासगी शाळांमध्ये अशा स्वरूपाचे उपक्रम राबविले जातात, परंतु महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांठी असे उपक्रम राबविले जात नाही. त्यामुळे महापालिकेच्या शाळेत पर्यावरणपूतरक गणेशमूर्ती साकारण्याची कार्यशाळा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली. चित्रकलेप्रमाणेच शिल्पकृती साकारण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सुनील महाजन म्हणाले, संवाद, पुणे या संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. महापालिकेच्या शाळेमध्ये गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा पहिल्यांदाच होत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कलागुण दर्शविण्याची संधी मिळाली आहे.
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मूर्तींचे प्रदर्शन
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे दि. 28 ऑगस्ट रोजी हिंदू हृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन, सारसबागेसमोर येथे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या वेळी कलाकार, शिल्पकार, मूर्तीकार, चित्रकार, रांगोळी कलाकार यांचा सन्मान करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन दुपारी 4 वाजता होणार आहे.