पुणे-बारमध्ये बिलावरून झालेल्या वादातून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून करण्यात आला आहे. गोट्या उर्फ अमोल शेजवाळ (वय:३४, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.ही घटना सिंहगड रस्ता परिसरातील वीर बाजी पासलकर (वडगाव) पुलाजवळील क्लासिक बारसमोर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पुलाजवळ असलेल्या क्लासिक बारमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार गोट्या शेजवाळ व त्याचे मित्र दारू पिण्याकरिता बसले होते. दरम्यान रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बिलावरून बारचालकात व गोट्या शेजवाळ यांच्यात वाद सुरू झाला. तो बार बाहेर जाऊ लागल्याने तेथील बाऊन्सरने त्याला हॉटेलबाहेर अडविले. त्यातून त्याचे बाऊन्सरबरोबर वाद सुरू झाले. यात वाद इतके टोकाला गेले की, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. बार लगत असलेल्या टायर पंक्चर दुकानातील हातोडी आणून बाऊन्सरने त्याच्या डोक्यात मारले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, तसेच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राघवेंद्र क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव, समीर चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक सुरेश जायभाय, अक्षय चव्हाण आदींसह पोलिस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे .