अन्यथा ठेकेदारावर अटी शर्तीनुसार कारवाई करा
पुणे / पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२ मौजे भोसरी येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गृहप्रकल्प एक आणि दोनमधील सदनिकाधारकांच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधितांसह प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदाराची संयुक्त बैठक घेत तातडीने दोष मुक्त कामे करण्याचे निर्देश दिले. दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदार यांच्यावर निविदेतील अटी शर्तीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाईचे निर्देश यावेळी महानगर आयुक्तांनी यंत्रणेला दिले.
पेठ क्रमांक १२ भोसरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प एक आणि दोनमध्ये सदनिकांची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या सदनिकाधारकांनी काही दिवसापूर्वी पीएमआरडीएकडे सदनिकेतील बाथरूम, टॉयलेट, टेरेस, सोलर वाटर लाईन, ड्रेनेज लाईन याचा इतर सुविधांबाबत अपेक्षितरित्या ठिकेदाराकडून जलदगतीने काम होत नसल्याची तक्रारी मांडल्या होत्या. त्यानुसार महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सदनिकाधारक, लोकप्रतिनिधी, प्राधिकरणाचे अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि संबंधित ठेकेदार यांची संयुक्त बैठक घेत अडचणी जाणून घेतल्या. यात गृह प्रकल्पाच्या कामातील आढळून आलेले दोष, तक्रारी तातडीने निराकरण करण्यासाठी पुढील एका महिन्यात मुदत संबंधितांना देण्यात आली.
संबंधित गृह प्रकल्प कामाच्या गुणवत्तेबाबत त्रयस्त संस्थेकडून तपासणी करून घेत प्रमाणपत्र घ्यावे. यासह संबंधित ठेकेदार यांच्या कामातील संथगतीकरिता तसेच नेमून दिलेल्या कालावधीत काम पूर्ण न झाल्यास त्यांच्यावर निविदा प्रक्रियेतील अटी शर्तीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.