पुणे, दि.२२: आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी दक्ष राहून समन्वयाने काम करण्यासोबतच नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती मुख्य बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने आयोजित ‘दक्ष’ आपत्ती व्यवस्थापन परिषद २०२४ च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी ज्योती कदम, औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अपर संचालक शारदा होंदुले, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार वैशाली म्हस्के, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय कचोळे, तहसीलदार मीनल भोसले, जयश्री आव्हाड, पुणे महानगरपालिका उपआयुक्त गणेश सोनावणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पुणे महानगरपालिका मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.
श्रीमती द्विवेदी म्हणाल्या, आपत्तीचे भय, त्याविषयीची चिंता, आपत्तीमुळे येणारे दुःख, नैराश्य या सर्व बाबींचा आपत्तीच्या काळात नागरिकांच्या जीवनशैलीवर दूरगामी परिणाम होतात. शहरी आणि ग्रामीण भागातील आपत्तीच्या घटना वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. आपत्तीच्या काळात नागरिकांच्या प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा असतात. अचानक येणाऱ्या आपत्तीच्या काळात समयसूचकता खुप महत्वाची बाब आहे. सूक्ष्म नियोजन करुन उत्तम संवादद्वारे परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे. अशावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे. मदत व बचावकार्यात स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवावा.
मागे घडलेल्या घटनांचे विश्लेषण करुन पुढील घटना टाळण्याकरीता उपयोग करता येईल. त्यामुळे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपत्ती व्यस्थापनाबाबत ज्ञानाची देवाण-घेवाण करावी, असेही श्रीमती द्विवेदी म्हणाल्या.
श्री. चव्हाण म्हणाले, पुणे विभागात मागील दहा वर्षात पूरपरिस्थिती, दरड कोसळणे, भुस्खलन अशा विविध आपत्तीला आपल्याला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीला यशस्वीरित्या तोंड देता यावे याकरीता आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार गाव, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये चुकीच्या अफवा पसरविण्याऱ्या व्यक्ती आणि काम टाळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आपतीच्या काळात स्थानिक यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.
श्रीमती म्हस्के यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आढावा, श्री. सोनावणे यांनी शहरी आपत्ती व्यवस्थापन तसेच श्री. बहिवाल यांनी आपत्ती व आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
प्रा. सतीश थिंगळे यांनी दरड कोसळणे, करावयाच्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.