श्री राघवेंद्र स्वामी मठात मध्य आराधना संपन्न
पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील श्री वरदेन्द्र श्री राघवेंद्र स्वामी मठात श्री राघवेंद्र स्वामी ३५३ वा आराधना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मध्य आराधना झाली. यावेळी मठातील वृंदावनाला फुलांची सजावट करण्यात आली होती. प्रसन्न वातावरण असलेल्या पेशवेकालीन मठात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
मंत्रालयचे (आंध्र प्रदेश) पीठाधीश १०८ डॉ. श्री श्री सुबुधेंद्र तीर्थ स्वामी यांच्या मार्गदर्शनातून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मठाचे व्यवस्थापक दत्तात्रेय जोशी म्हणाले, आराधना महोत्सवानिमित्त मठातील वृंदावनाला फुलांची सजावट करण्यात आली असून यासाठी बंगळुरू वरून विशेष फुले मागविण्यात येतात. मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी सुप्रभात सेवा १०८ लिटर दुधाचा अभिषेक, अलंकार, महामंगल आरती, अन्नदान सेवा, दासवाणी आणि सायंकाळी सहा वाजल्यानंतर रथोत्सव, स्वस्ती वाचन, ढोल उत्सव, महामंगल आरती, अष्टोत्तर आरती, पारायण आदी कार्यक्रम झाले.
राघवेंद्र स्वामींची शिकवण देणारा लक्ष्मी रस्त्यावरील हा मठ २५० वर्षे जुना आहे. मठाची स्थापना १७८५ मध्ये झाली होती. पंडित भीमसेन जोशी यांची लहानपणापासूनच राघवेंद्र स्वामींवर श्रद्धा होती ते देखील मठामध्ये येत आणि गायन सेवा करीत असत अशी आठवण दत्तात्रेय जोशी यांनी यावेळी सांगितली.आराधना महोत्सवात देखील सायंकाळी संगीत सेवा कलाकारांकडून दिली जाते.