वंदे मातरम् संघटना व सहयोगी संस्थांतर्फे सलग १८ व्या वर्षी उपक्रम
पुणे : शहराच्या मध्यभागातील बुधवार पेठेतील वस्तीतून जाताना रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलांकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले जाते. पण ते नाते सोडून कोणीतरी आपल्याकडे रक्षाबंधनासाठी येते, ही भावना त्या महिलांसाठी सुखावणारी ठरली आणि देवदासी भगिनींसोबत युवा कार्यकर्त्यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले.
वंदे मातरम् संघटना, संयुक्त युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट, वीर हनुमान मित्र मंडळ, आणि अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठेत गेली १८ वर्षे देवदासी भगिनीं बरोबर रक्षाबंधन या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी वंदे मातरम् संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, प्रकाश यादव, वीर हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष आनंद सागरे, सामाजिक कार्यकर्ते पै. श्रीकांत झुंजुरके, रवी कांबळे, आयटी सेल प्रमुख विशाल शिंदे, आयाज खान आदी उपस्थित होते.
सचिन जामगे म्हणाले, सण करु साजरे माध्यम जरासे वेगळे, हे ब्रीद घेऊन आम्ही युवा कार्यकर्ते सामाजिक काम करीत आहोत. देवदासी महिलांसोबत रक्षाबंधन ही कृती जरी छोटी असली, तरी देखील त्यातून समाजाला मिळणारा संदेश खूप वेगळा आहे. खरं तर, या गल्लीतून जाताना देवदासी भगिनींकडे वेगवेगळ्या नजरेने पाहिले जाते. पण कुणीतरी रक्षाबंधनासाठी दरवर्षी आपल्या कडे येते, हा आनंद त्यांच्या गगनात मावण्यासारखा नसतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि स्मितहास्य आम्हाला नवीन ऊर्जा देऊन जाते.
कार्यक्रमाचे आयोजन वंदे मातरम् संघटनेचे विद्यार्थी किरण केकाणे, आदित्य मुंगळे, ओम जामगे, तुषार गिरी, गिरीश धुमाळ आणि अमोल भुरेवार यांनी केले होते.

