थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने मुरलीकांत पेटकर यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार जाहीर
पुणे : इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले, तेव्हा रायगडासह विविध ठिकाणच्या वास्तू पाडल्या. त्या वास्तू पाहतानासगळ्यांच्या अंगात स्फूर्ती येईल, ही भीती त्यांना होती. छत्रपती शिवाजी महाराजानी स्वराज्य निर्माण केले, तर बाजीराव पेशवे यांनी साम्राज्य उभे केले. असा राष्ट्रपुरुष होणे नाही. त्यामुळे श्रीमंत बाजीराव पेशवे हे शौर्याचे मेरुमणी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी केले.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२४ व्या जयंती दिनी थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना टिळक रस्त्यावरील आय. एम. ए. बिल्डिंग संचेती सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पेशव्यांचे वंशज पुष्कर सिंह पेशवा, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, उमेश देशमुख आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, शनिवारवाड्यामध्ये काही ठिकाणी फलक आहेत, चित्रे नामशेष झाली आहेत. दगडी बांधकामावर सिमेंट लावले आहे. त्यामुळे पूर्वीसारखे प्रतिबिंब आज शनिवारवाड्याचे दिसेल हा प्रयत्न आपण करूया. शनिवारवाड्याकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. बाहेरच्या देशात अशा वास्तूचे संवर्धन उत्तमरितीने होते. आता आपणही याकडे लक्ष देऊ. त्याकरिता दिल्ली येथे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, बाजीराव पेशवे यांच्या शौर्याने आपण चकीत होतो. एकही लढाई न हरलेले ते योद्धे होते. शनिवारवाडयापासून अनेक गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. तेथील परवानग्या हाच मोठा विषय आहे. तरीही आपण हे लवकरच करूया.
कुंदनकुमार साठे म्हणाले, सैन्यात मोठे कार्य केलेल्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. ज्याप्रमाणे बाजीराव पेशवे यांनी स्वराज्याचे स्वप्न साम्राज्यात उतरवत पूर्ण केले. असे कार्य करणा-या पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना हा पुरस्कार देण्यात आला. भूषण गोखले, मुरलीकांत पेटकर यांनी मनोगत व्यक्त केले. मोहन शेटे यांनी सूत्रसंचालन केले.