पुणे: “सोशल मीडिया एखाद्याला सर्वोच्चस्थानी घेऊन जातो, तर एखाद्याला उध्वस्त करतो. हे माध्यम म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण असून, दुधारी तलवार आहे. त्यामुळे त्याचा वापर करताना चांगल्या-वाईट परिणामांचा सांगोपांग विचार करून केला पाहिजे,” असे मत केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
कॅलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्टस् अकादमीच्या वतीने ‘डिजिटल मीडिया व नवे प्रवाह’ या विषयावर ‘आयएमडीआर’च्या सावरकर सभागृहात आयोजित ‘कॅलिडस संवाद’ कार्यक्रमात मोहोळ बोलत होते. प्रसंगी बीबीसी मराठीच्या पत्रकार विशाखा निकम व एबीपी माझाचे पत्रकार निलेश बुधावले यांना ‘कॅलिडस एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. तसेच उल्लेखनीय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक डॉ. निलेश खरे, बीबीसी न्यूज मराठीचे संपादक अभिजित कांबळे हे विशेष अतिथी, तर खंडेराय प्रतिष्ठानचे डॉ. सागर बालवडकर, संयोजक व ‘कॅलिडस’चे संचालक पंकज इंगोले, पूनम इंगोले, उचित मीडियाचे संचालक जीवराज चोले, इट्स माय डिझाईनचे महेश रेड्डी आदी उपस्थित होते. पंकज इंगोले यांनी मोहोळ यांची प्रकट मुलाखत घेतली.
तत्पूर्वी, ‘डिजिटल मीडिया व नवे प्रवाह’ या विषयावरील परिसंवादात अभिजित कांबळे यांच्यासह पत्रकार व युट्युबर प्रशांत कदम, ‘भाडिपा’च्या सहसंस्थापिका पॉला मॅकग्लीन, ‘आरपार’च्या संस्थापिका अश्विनी तेरणीकर, डिजिटल क्रिएटर अथर्व सुदामे यांनी विचार मांडले. ‘मित्र म्हणे’चे प्रमुख सौमित्र पोटे यांनी परिसंवादाचे संचालन केले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “सहकार आणि नागरी वाहतुकीच्या सुविधा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. माध्यमांचे स्वरूप बदलते आहे. सामान्य माणूसही यामध्ये जोडला गेला आहे. त्यामुळे थेट नागरिकांशी संवाद होऊ शकतो. त्यांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचत असून, त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सोशल मीडिया व डिजिटल मीडियाचा चांगला वापर करून देशाच्या, समाजाच्या हिताच्या गोष्टी करण्यावर माझा नेहमीच भर राहिला आहे.”
डॉ. निलेश खरे म्हणाले, “तंत्रज्ञान बदलते, तशी माध्यमेही बदलतात. त्याचे स्वरूप बदललेले असले, तरी आशय खूप महत्वाचा आहे. कृत्रिम बुद्धिमतेचे आव्हान आहे. त्यामुळे अनेक पर्याय बंद होतील, काही नवे पर्याय येतील. पण आशय आणि नाविन्यता शाश्वत आहे. वेगळेपण जपताना नवी कौशल्ये, नवे तंत्र आत्मसात करावे.”
डिजिटल मीडियामुळे पत्रकारितेचे लोकशाहीकरण झाले आहे. नवे पर्याय खुले झाले आहेत. पोहोच वाढली असली, तरी विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे अभिजित कांबळे यांनी नमूद केले. आपल्या मनातील कल्पना, आशयनिर्मिती मुक्तपणे मांडण्याचे स्वातंत्र्य डिजिटल मीडियामुळे मिळाले आहे. आपण जे देतो, ते लोकांना भावेल का, याचा विचार करणे गरजेचे असल्याचे अथर्व सुदामे यांनी सांगितले.
प्रशांत कदम म्हणाले की, डिजिटल माध्यमांचे महत्व आता हळूहळू सगळ्यांना कळत आहे. चांगल्या आशयाला प्रतिसाद मिळतो आहे. काही दिवसांनी लागू होणाऱ्या ब्रॉडकास्ट सर्व्हिस विधेयकानंतर डिजिटल मैद्याचे भवितव्य ठरेल. मुख्य प्रवाहातील मीडिया योग्य भूमिका बजावत नसल्याने समांतर माध्यमांना अधिक संधी आहेत.
पॉला मॅकग्लीन यांनी भाडिपाच्या माध्यमातून बदलत्या पिढीला अनुसरून आशय देण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले. प्रत्येक वयोगटाला जोडून ठेवता येईल, असे कार्यक्रम केले जातात. त्यामुळे डिजिटल माध्यमांमध्ये एक वेगळी ओळख मिळते, असे नमूद केले. अश्विनी तेरणीकर यांनी ‘आरपार’च्या प्रवासाविषयी, तसेच वुमन की बात, बॉईज टॉक्स यातून नवनवे विषय कसे मांडता आले, याविषयी सांगितले.