पुणे-
मुंबई – गोवा महामार्गाच्या कामावरुन महायुतीमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दांत शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सोमवारी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेनंतर चव्हाण यांनीही थेट रामदास कदम यांचे थोबाड फोडण्याची भाषा केली आहे. यामुळे सत्ताधारी महायुतीतील राजकीय द्वंद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मोठ्या नेत्यांनी सांभाळून बोलावे, असा इशाराच फडणवीस यांनी दिला आहे.
अशाप्रकारे आरोप करणे हा कोणता युतीधर्म आहे? असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. अशा प्रकारे माध्यमांसमोर आरोप करणे हे चुकीचे आहे. त्यांचे काही म्हणणे असेल तर त्यांनी ते युतीमध्ये मांडावे. रामदास कदम यांचे जे म्हणणे असेल ते आम्ही समजून घेऊ, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांना सुनावले आहे. रामदास कदम हे वारंवार टोकाचे बोलतात. त्यामुळे आमच्या देखील भावना दुखावल्या जातात. आम्ही देखील माणसे आहोत. वारंवार भारतीय जनता पक्षाला बोलणे, हे आम्हाला मान्य नाही. यासंदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.