अहमदाबाद–
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज अहमदाबादमध्ये गुजरात येथे अहमदाबाद महानगरपालिकेच्या सुमारे 1003 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
अहमदाबाद महानगरपालिकेने भावी पिढ्यांसाठी 100 दिवसात 30 लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्र्यांनी सांगितले. या स्तुत्य मोहिमेशी आपला अतिशय जवळचा संबंध असल्याचे ते म्हणाले.
आपण जेवढा कार्बन डाय ऑक्साईड निर्माण करतो, मग तो वाहनातून असो की शरीरातून किंवा एसीद्वारे किंवा प्रकाशयोजनेद्वारे असो, प्रत्येक नागरिकाने आपल्या जीवनातील कार्बन डायऑक्साइड कमी करून ऑक्सिजन वाढवणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवले पाहिजे असे त्यांनी सांगितले. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ हे दोन्हीही आज पृथ्वी आणि मानवाच्या अस्तित्वासाठी गंभीर धोके आहेत.
पंतप्रधान आणि गुजरातचे सुपुत्र नरेंद्र मोदीजी यांनी देशातील जनतेला ‘एक पेड माँ के नाम’ लावण्याचे आवाहन केले आहे, असे अमित शहा म्हणाले. जर आई हयात असेल तर तिच्यासोबत झाड लावावे आणि ती हयात नसेल असेल तर तिचे छायाचित्र घेऊन ते झाड लावावे, असे त्यांनी सांगितले. आपल्या मातांचे आपण ऋणी असल्याचे व्यक्त करण्याचा यापेक्षा दुसरा चांगला मार्ग किंवा कृती नाही, असे ते म्हणाले.
वृक्षारोपण करण्याची आपली जबाबदारी आपण सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे. लावलेले झाड आपल्या उंचीचे होईपर्यंत एखाद्या बालकाप्रमाणे त्याची काळजी घेऊन अशा प्रकारच्या कामाला प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “ एक पेड माँ के नाम” ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली केवळ एक घोषणा नसून ती एक लोकचळवळ आहे, असे ते म्हणाले.
तब्बल 60 वर्षांनी देशातील जनतेने एका व्यक्तीला सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवले आहे आणि हा बहुमान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. अहमदाबादने देखील लोकसभेच्या तिन्ही जागांचा कौल नरेंद्र मोदी यांना देऊन आपले योगदान दिले तर गुजरातने 25 जागांचे योगदान दिले, असे त्यांनी सांगितले.