पुणे, दि. १८: भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात ६ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या व मतदार यादीत अद्यापपर्यंत नाव न नोंदविलेल्या नागरिकांनी त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडयासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम (दुसरा) राबविला आहे. ६ ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुर्ररिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २० ऑगस्ट २०२४ पर्यंत राबविला जाणार आहे. नागरिकांना या मुदतीपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे.
प्रारूप यादीमध्ये मतदारांनी आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्म दिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील देखील अचूक असल्याबाबत खात्री करणे आवश्यक आहे. १ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकांना या कालावधीत मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच ज्या मतदारांची नावे वगळली गेलेली आहेत अथवा ज्यांची नावे मतदार यादी मध्ये नाहीत अशा सर्व नागरिकांनी नमुना अर्ज क्रमांक ६ भरून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत.
ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी https://voters.eci.gov.in हे संकेतस्थळ तर आपली नावे मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. मतदार यादीसंदर्भात काही माहिती आवश्यक असल्यास अथवा काही दुरूस्ती असल्यास जिल्हा निवडणूक कार्यालयात तसेच संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.