पुणे- मटका किंग नंदू नाईक याच्या शिवाजी रोडवरील जनसेवा बिल्डिंगमधील अड्यावर छापा टाकून ८ जणांना अटक केली आहे . त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम व जुगाराचे साधनांसह २ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी अनेकदा छापे घातल्यानंतरही काही दिवसांनी नंदू नाईकचे हे मटका अड्डे पुन्हा सुरु असल्याचे दिसून येते. याठिकाणी सुरु असलेला अड्डा पोलिसांशी असलेली अवैध धन्देवाल्यांशी जवळीक किती घट्ट झाल्याचे सांगतो आहे तर सातारा रस्त्यावरील केके मार्केट जवळील अड्ड्यावर तर चक्क भाजप माजी नगरसेवकाचे नाव मोठ्या अक्षरात टाकून हा धंदा चालविण्यात येतो आहे , काहीजणांनी गेल्या ३/ 4 वर्षापूर्वी स्वारगेट सहायक पोलीस आयुक्तांच्या कडे तक्रार करूनही कारवाई न होता त्यांनाच दमदाटी झाल्याने हा अड्डा अव्याहत पणे सुरूच राहिला आहे.एवढेच नव्हे तर सातारा रस्त्यावर रांका ज्वेलर्स च्या लगत देखील एक अड्डा बिनदिक्कत पणे सुरु असल्याने शहरात अवैध धंदे कोणीही बंद करू शकलेले नाही हेच स्पष्ट झाले आहे.
दरम्यान नंदू नाईक प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस हवालदार त्रिंबक बामगुडे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष लक्ष्मण गुजर (वय ५२, र. शिवाजीनगर गावठाण), रवींद्र धोंडिबा गजदाणे (वय ४२, रा. पिरंगुट), गोविंद अनंतराव वेदपाठक (वय ४३, रा. सासवड), राजू बबनराव गोरे (वय ३२, रा. पिरंगुट), किसन दत्तात्रय तावरे (वय ४३, रा. पिरंगुट), रोहन किसन तावरे (वय १९, रा. धाराशिव), निलेश कृष्णाजी रणपिसे (वय ५२,रा. सांगवी), नंदकुमार बाबुराव नाईक (वय ७६, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकुमार नाईक हा मटका किंग म्हणून ओळखला जातो. त्याचे शहरात अनेक ठिकाणी मटक्याचे अड्डे सुरु असतात. शुक्रवार पेठेतील जनसेवा भोजनालयाचे मागील जागेत मटका अड्डा सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट १ व युनिट २ च्या अधिकार्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने येथे छापा घातला. तेव्हा तेथे कल्याण ओपन मटका जुगाराच्या चिठ्ठया दिल्या जात होत्या. त्यांच्याकडून मोबाईल, ९५ हजार ७४० रुपये रोख, जुगाराची साधने असा २ लाख ११ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस फौजदार हर्षल कदम तपास करीत आहेत