यूपीएससी 2022 च्या निकालात आपले 200 हून अधिक उमेदवार उत्तीर्ण झाल्याचा संस्थेने केला होता दावा, प्रत्यक्षात 171 उमेदवारांची निवड
श्रीराम आयएसएस प्रशिक्षण संस्थेने दिशाभूल करणारी जाहिरात तत्काळ बंद करावी, सीसीपीएसचे आदेश
नवी दिल्ली-
श्रीराम आयएएस प्रशिक्षण संस्थेने यूपीएससी 2022 च्या निकालासंदर्भात दिशाभूल करणारी जाहिरात केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) संस्थेवर 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि प्रचार तसेच ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा सेवांची खोटी किंवा दिशाभूल करणारी जाहिरात केली जाणार नाही या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित प्रकरणात ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्याने सीसीपीएच्या अध्यक्ष तथा मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांनी श्रीरामच्या आयएएस विरुद्ध आदेश जारी केला आहे.
प्रशासकीय सेवा संदर्भातील प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि ऑनलाइन शिक्षण-तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्स हे यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती न देता त्यांची छायाचित्रे आणि नावे इतर संभाव्य उमेदवारांना (ग्राहकांना) प्रभावित करण्यासाठी वापरतात, असे आढळून आले आहे.
श्रीराम आयएएस संस्थेने आपल्या जाहिरातीत पुढीलप्रमाणे दावे केले होते.
i) “यूपीएससी 2022 परीक्षेत संस्थेच्या 200 हून अधिक उमेदवारांची निवड.”
ii) “आम्ही भारतातील प्रथम क्रमांकाची प्रतिष्ठित यूपीएससी प्रशिक्षण संस्था आहोत.”
सीसीपीएला असे आढळून आले की श्रीराम आयएएस संस्थेने विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांची जाहिरात तर केली, मात्र यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात माहिती जाहिरातीत जाणीवपूर्वक दडवून ठेवण्यात आली होती. यामुळे संस्थेतर्फे दावा करण्यात आलेल्या सर्व यशस्वी उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळावर जाहिरात केलेल्या सशुल्क अभ्यासक्रमांची निवड केली होती, या असत्य बाबीवर ग्राहकांचा विश्वास बसला.
ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम – 2(28) (iv) मध्ये महत्वाची माहिती जाणूनबुजून दडवून ठेवण्यासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात तरतूद आहे. यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाची माहिती ग्राहकांनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे, ज्याच्या मदतीने स्वतःच्या निवडीचा अभ्यासक्रम आणि कोणत्या प्रशिक्षण संस्थेत प्रवेश करायचा याबाबत ते माहितीपूर्ण विवेचन करू शकतील.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आयोजित नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये 200 हून अधिक उमेदवारांच्या निवडींच्या दाव्याच्या विरोधात उत्तर देताना श्रीराम आयएएस संस्थेने आपल्या बाजून अवघ्या 171 यशस्वी उमेदवारांचा तपशील सादर केला. या 171 उमेदवारांपैकी 102 उमेदवार हे विनामूल्य मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रम (IGP), तर 55 उमेदवार हे विनामूल्य चाचणी शृंखलेतील होते, याशिवाय 9 उमेदवार सामान्य अभ्यासक्रम प्रशिक्षणातून सहभागी झालेले होते, तर 5 उमेदवार हे राज्य सरकार आणि संस्था यांच्यात विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी झालेल्या सामंजस्य करारा अंतर्गत विविध राज्यांतील होते. त्यांच्या जाहिरातीत ही वस्तुस्थिती उघड करण्यात आली नाही, त्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली.
नागरी सेवा परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी (PT) अशा पद्धतीने परीक्षेचे सर्व 3 टप्पे पार करावे लागतात ही सर्वज्ञात वस्तुस्थिती आहे. पूर्व परीक्षा ही प्रारंभिक चाचणी असून, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी या दोन्हींमध्ये मिळालेले गुण अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जातात. मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी साठी एकूण गुण अनुक्रमे 1750 आणि 275 आहेत.
अशा प्रकारे एकूण गुणांमध्ये व्यक्तिमत्व चाचणीचे योगदान 13.5% आहे. श्रीराम आयएएस संस्थेकडून कोणतेही योगदानात्मक सहाय्य न घेता बहुतांश उमेदवारांनी आधीच प्राथमिक आणि मुख्य परीक्षा हे टप्पे स्वतःच्या बुद्धिमत्तेवर उत्तीर्ण केले होते. श्रीराम आयएएसने अशाच यशस्वी उमेदवारांना मार्गदर्शन केले होते ज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेची प्राथमिक आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती ही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवून, उमेदवारांना हे कळू न देता अशा फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थी असलेल्या ग्राहकांवर मोठा प्रभाव निर्माण करतात. अशाप्रकारे, या जाहिरातीने अनुचित व्यापार प्रथा राबवत ग्राहकांचे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या माहिती प्राप्त करून घेण्याच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे.
जाहिरातीमध्ये महत्त्वाची माहिती सुस्पष्ट, उघड आणि ग्राहकांची दिशाभूल करणे अत्यंत अवघड ठरेल अशा प्रकारे जाहीर करून वस्तुस्थितीचे सत्य आणि प्रामाणिक प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे यावर सीसीपीएच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी भर दिला. ग्राहक हक्कांचे महत्त्व आणि ग्राहकांना अचूक माहिती पुरविण्याची जाहिरातदारांची जबाबदारी त्यांनी यावेळी अधोरेखित केली.