पुणे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची ताकद वाढली तर दीड हजाराचे तीन हजार देऊ, अशी आज येथे ग्वाही दिली. तर सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका, ते चूकीचे काही तरी सांगून ते तुमची दिशाभूल करतील, असेही ते म्हणाले.पुण्यात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, चंद्रकांत दादा पाटील, मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी आदी मान्यवर यांची उपस्थिती होती.
एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, सर्वसामान्यांसाठी आम्ही योजना राबवत आहोत, आमचं सरकार फक्त देणारं आहे घेणारं नाही. घर चालवताना माझी आई कशी कसरत करायची हे मी डोळ्याने पाहिले आहे. विरोधकांसह फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना अन् पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजार रुपयांची किंमत कळणार नाही. माझ्या बहिणींना दीड हजारांची किंमत कळते. आता माझ्या बहिणींना यापुढे दर महिन्याला माहेरचा आहेर दीड हजार मिळत जाईल.
शिंदे पुढे म्हणाले की, आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही. गोरगरीबीतून संघर्षातून चटके खाऊन आम्ही समोर आलो आहोत. मी मुख्यमंत्री झालो होतो, त्यापेक्षा अधिक आनंद मला आज या योजनेच्या वितरणावेळी झालेला आहे.
शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, माणसाने माणसासारखा वागलं पाहिजे, देव मंदिरात नाही माणसात असतो, असा मानणारा मी व्यक्ती आहे. त्यामुळे बहिणींसाठी काही तरी चांगलं करता आला, याचा मला सर्वस्वी अभिमान आहे. माझ्या बहिणींना विनंती आहे की, कोणावरही विश्वास ठेवू नका, कोणी काहीही सांगेन, सावत्र भाऊ हल्ली चूकीचं सांगू लागले आहेत. ही योजना अजिबात बंद होणार नाही, वेळप्रसंगी आम्ही ही योजना अधिक जोमाने चालवू, त्यातील रक्कम पुन्हा वाढवू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
अनेकांना मी आतापर्यंत पुरून उरलो आहे. सावत्र कपटी भाववर मात करून आम्ही इथपर्यंत आलो आहे. त्यांना केवळ लक्षात ठेवा त्यांना निवडणुकीत जागा दाखवून द्या. लाडकी बहिण योजनेत कशाप्रकारे खोडा घालता येईल प्रयत्न केले. संधी आली की सावत्र भावना जोडा दाखवा. लाडकी बहीण योजना सुरू करताना वर्षभराचे आर्थिक नियोजन करण्यात आले. आम्हाला रोज विरोधक शिव्या देत आहे, आरोप करत आहे पण सर्वांच्या आशीर्वादाने सरकार केवळ टिकले नाही तर मजबूत झाले. तोंडाला फेस येईपर्यंत आम्ही फेसबुक लाईव्ह केले नाही. आमच्यावरील टीका आम्ही सहन करू पण बहिणींच्या आड कोण आले तर यात आमचा नाद करायचा नाही, असा इशारा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला.