एमआयटी डब्ल्यूपीयूत ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
पुणे, १६ ऑगस्टः “देशाच्या सुरक्षेचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, त्यावेळेस देशाअंतर्गत विवादांवर सर्वात प्रथम लक्ष देणे गरजेचे आहे. या देशाला बाह्य शत्रुंपेक्षा अंतर्गत शत्रुंचा अधिक धोका आहे.” असे प्रतिपादन जनरल (निवृत्त, सेनाप्रमुख) डॉ.मनोज नरवणे यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने कोथरूड कॅम्पस येथे जनरल (निवृत्त, सेनाप्रमुख) डॉ.मनोज नरवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ७८ वां स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला.
या वेळी मेजर जनरल विक्रम देव डोगरा (निवृत्त) व सौ.विणा नरवणे हे सन्मानीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील उपस्थित होते. तसेच संस्थेचे सर्व संचालक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व हजारो विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ.मनोज नरवणे म्हणाले, “देशाअंतर्गत वाढत जाणाऱ्या भेदभावाला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. विकसित भारतासाठी कार्य करतांना भारतीय संविधानाच्या तत्वांचे पालन करावे. देशासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहून आपले कर्तव्य केल्यास प्रगती निश्चित आहे.”(निवृत्त) मेजर जनरल विक्रम देव डोगरा म्हणाले, “राष्ट्रनिर्मितीसाठी देशातील प्रत्येक नागरिकाने कार्य करावे. देशातील उत्तम नागरिक बनण्यासाठी सर्वांनी आपले स्वास्थ्य जपावे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “भारतमातेसाठी समर्पित भावना जागविण्याचा हा दिवस आहे. शिस्त, चारित्र्य आणि समर्पण या गोष्टीच्या आधारे देशसेवा करावी. तसेच प्रत्येकाने माता-पिता आणि देशसेवेचे प्रामाणिकपणे कर्तव्य बजवावे. भारताजवळ विश्वगुरू बनण्याबरोबरच जगाला सुख, शांती आणि समाधान देण्याची शक्ती आहे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, “सध्या देशात जात, समूदाय, गुन्हेगारी, परिवर्तन, भ्रष्टाचार यांचे प्रमाण वाढत आहे. कलोनियल माइंडसेट बदलणे आवश्यक आहे. अशा वेळेस राजकारणात प्रगल्भता वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी सुशिक्षित युवकांनी राजकारणात येणे गरजेचे आहे. तसेच लोकांची मानसिकता बदलण्याची संस्कृती निर्माण होणे गरजेचे आहे.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.
राहुल विश्वनाथ कराड यांनी हजारो विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या रक्षणाची शपथ दिली.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.