पुणे-सार्वजनिक जीवनात काम करताना, सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा ओळखून उपक्रम राबविणे, याला माझे नेहमीच प्राधान्य असते. त्यातून गेल्या चार वर्षांपासून विधानसभा मतदारसंघात अनेक उपक्रम कार्यान्वित आहेत. आंतरसोसायटी एकांकिका स्पर्धा ही समाजाच्या एकत्रिकरणासाठी राबविण्यात आल्याचे प्रतिपादन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले.
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड विधानसभा मतदारसंघातील नवोदित आणि हौशी कलाकारांसाठी आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी, भाजपा कोथरूड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड मंडल सांस्कृतिक प्रकोष्टच्या अध्यक्षा मधुरा वैशंपायन, आशुतोष वैशंपायन, स्पर्धेचे परिक्षक भालचंद्र करंदीकर, अनुराधा राजहंस , माधव जोगळेकर यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, समाजाची गरज ओळखून काम करणं त्याला माझे नेहमीच प्राधान्य असते. त्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघात समाजाच्या विविध घटकांसाठी अनेक सेवा उपक्रम राबविले आहेत. त्यासोबतच समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तींनी एकत्रित येऊन आपला आनंद साजरा करावा असे मला वाटते. त्यासाठीच काही दिवसांपूर्वी श्रावण महोत्सवाचे आयोजन केले होते. महिलांचा यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद होता. अनेक महिलांनी यामध्ये सहभागी होऊन मंगळागौर कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीना काही सुप्तगुण दडलेले असतात. त्यांना व्यासपीठ आवश्यक असते. भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून अशा सुप्तगुण दडलेल्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता. त्यालाही कोथरुड विधानसभा मतदारसंघातील हौशी कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविल्याचे पाहून आनंद होतो, अशी भावना व्यक्त केली.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या की, आजच्या आधुनिक युगात अनेकजण आपला सर्वाधिक काळ व्हॉट्सॲप, फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्म वर व्यतित करतो. मात्र, अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळण्यासोबतच त्यांचे एकत्रीकरण होऊन विचारांची देवाणघेवाण होते. पण त्यासोबतच एकत्रित येऊन आनंद साजरा करता येतो. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याची भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या स्पर्धेत कोथरुड मधील आयडियल कॉलनीने सादर केलेल्या शापित कुंकू एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळाले. तर द्वितीय पारितोषिक द जर्नी – युथिका सोसायटी, सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय पारितोषिक एक दिवस असाही – सृष्टी सोसायटी आणि गाव पावनं – बळवंतपुरम साम्राज्य सोसायटी यांना विभागून देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुरा वैशंपायन यांनी केले. तर सूत्रसंचालन दिग्विजय जोशी यांनी केले.