माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीवर ठाण्यात झालेला हल्ला निषेधार्ह.
नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्याची आढावा बैठक नांदेडमध्ये संपन्न.
नांदेड,
महायुती सरकार जनतेच्या विकासाची कामे करत नाही तर ५० टक्के कमिशनखोरी करुन मलई खात आहे. महायुती सरकार हे लोकशाही मार्गाने, जनतेने निवडून दिलेले सरकार नाही तर तोडफोड करून आयाराम, गयारामचे सरकार आहे, या असंवैधानिक सरकारवर जनतेचा विश्वास नाही. लोकसभा निवडणुकीत जसे या भाजपाला नाकारले तसेच विधानसभा निवडणुकीतही भ्रष्ट युती सरकारला हटवा व मविआचे सरकार आणा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या बैठका सुरु असून आज नांदेडमध्ये नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आला. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री अमित देशमुख, खा. वसंतराव चव्हाण, खा. डॉ. कल्याण काळे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील,आ. सुरेश वरपुडकर, आ. माधवराव जवळगावकर, आ.मोहन हंबर्डे, आ. डॉ. प्रज्ञा सातव, माजी मंत्री डी.पी. सावंत, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबीरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत बेटमोगरेकर पाटील, नांदेड शहराध्यक्ष अब्दुल सत्तार आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महायुती सरकारकडे जनतेच्या योजनांसाठी पैसे नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर काही योजना जाहीर केल्या आहेत त्यासाठी इतर योजनांचा पैसा वापरला जात आहे. विधान सभा निवडणुकीला काँग्रेस मविआ एकत्र सामोरे जाणार आहेत. जागा वाटपाची चर्चाही सुरु आहे. एक सक्षम जनतेचे सरकार देण्याचा मविआचा प्रयत्न आहे. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर ठाण्यात शेण व नारळ फेकण्यात आले, त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे, राजकारणात असे प्रकार होऊ नयेत असे रमेश चेन्नीथला म्हणाले.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरची एक जागा सोडली तर भाजपा महायुतीच्या विचाराला या जनतेने नापसंदी दाखवली आहे. मराठवाड्यात परिवर्तनाची लाट आहे. नांदेड शहर व जिल्हा खऱ्या अर्थाने २४ फेब्रुवारीला स्वतंत्र झाला असे चित्र दिसत आहे. २४ फेब्रुवारी हा दिवस काँग्रेसच्या उन्नतीचा दिवस ठरला आहे. भाजपाने दुसऱ्यांची घरे फोडली, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे घरही फोडले पण आता चित्र बदलले आहे, नांदेडमध्ये अनेक जण काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊ लागले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसने एकही जागा जिंकली नाही पण यावेळी नांदेडसह तीन जागा जिंकल्या आहेत. जे होते त्यांना भाजपा घेऊन गेले, जे होते ते चांगल्यासाठीच होते. मराठवाड्याच्या विकासाचा पाया शंकरराव चव्हाण, शिवाजी पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख यांनी रोवला त्याला पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न करु. मराठवाड्यातील जनता काँग्रेस व मविआच्या मागे उभी राहिल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानीबद्दल प्रश्न विचारला असता खोट्या प्रकरणाच्या आधारे त्यांचे सदस्यत्व घालवले होते. पण राहुल गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची प्रचिती पुन्हा आली आहे. हिंडनबर्गच्या अहवालाने अदानी आणि सेबी प्रमुखाच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केला आहे. सेबी व अदानी मिळून कसे गोरख धंदा करत होते ते समोर आले आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
मराठा आरक्षणावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरकारने गुलाल उधळला तो कशासाठी हे सरकारला विचारा, अर्धे मंत्रिमंडळ हाके यांच्याकडे तर अर्धे जरांगे पाटील यांच्याकडे जात होते. २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा, ओबीसी, धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते मग १० वर्षे सरकार असताना त्यांनी आरक्षण का दिले नाही. जातनिहाय जनगणना करण्याची जाहीर भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे पण भाजपा सरकारचा त्याला विरोध आहे म्हणजेच त्यांचा आरक्षणाला विरोध आहे.
महायुती सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, तेलंगणा व कर्नाटकातील काँग्रेस सरकारने महालक्ष्मी योजना आधीच सुरु केली आहे. पण महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर महिलांच्या मतासाठी ही योजना आणली आहे. काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यावर महालक्ष्मी योजनेतून महिलांना जास्त पैसे दिले जातील, तरुणानांही पैसे दिले जातील, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.