सांगली :जो जो ओबीसींच्या जीवावर उठला आहे, त्याला अजिबात सोडू नका, मराठ्यांना ओबीसीतून कदापी आरक्षण मिळणार नाही, मनोज जरांगे नावाच्या व्यक्तीला आरक्षण कशासाठी हेच कळत नाही, असे म्हणत मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली. सांगलीत ओबीसी एल्गार मेळावा पार पडला, यावेळी छगन भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा हल्लाबोल चढवला.
छगन भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात अन् लोकांवर अन्याय करणारी टोळी सद्या राज्यात उतरलेली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन महिने जरांगे मला शिव्या देत राहिला. पण मी शांत बसलो. पण बीडमध्ये ओबीसींच्या नेत्यांचे घरं जाळली. मग मी मात्र शांत राहू शकत नाही. 16 तारखेला मंत्रिपदाचा राजीनामा दिला अन् ओबीसी मेळावा घेतला. माझ्यामते महाराष्ट्र वाचला पाहिजे, महाराष्ट्र लुळा पांगळा झाला नाही पाहिजे, अशी माझी भूमिका आहे.
8 आमदार निवडून आणून दाखव
ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना पुन्हा थेट आव्हान दिलं. राज्यात 288 जागांवर उमेदवार उभे करू असं ते म्हणतात, अरे 88 जागा लढवून दाखव आणि त्यातले 8 निवडून आणून दाखव असं आव्हान भुजबळांनी मनोज जरांगे यांना दिलं. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही, सगेसोयऱ्यांना देखील आरक्षण देता येणार नाही हे जरांगेंनी समजून घ्यावं असं देखील ते म्हणाले.
विशाल पाटलांवरही साधला निशाणा
सांगलीचे वसंतदादा कुठे आणि आता त्याचे वारसदार कुठे असं म्हणत भुजबळांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली. तसेच मनोज जरांगे म्हणजे नवीन नेता असा उल्लेखही त्यांनी केला. आरक्षण हे आर्थिक स्थितीवर नसून सामाजिक मागासलेपणावर आहे, हे त्याला कसं समजणार असं म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.
मराठा शिल्लक राहील का?
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि आपल्याच लोकांवर हल्ले करतात. आज गावागावात ओबीसींवर हल्ले होत आहेत. आरक्षण कायद्यानुसार द्या ही आमची भूमिका आहे. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. सर्वांनाच कुणबी व्हायचं आहे तर मग मराठा शिल्लक राहील का?राज्यात 54 टक्के ओबीसी आहेत हे जरांगे विसरतात. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, तसंच सग्यासोयऱ्यांना आरक्षण देणं शक्य नाही असं छगन भुजबळांनी म्हटलंय. सगळे मराठे वाईट नाहीत, पण जो ओबीसीच्या आरक्षणावर उठेल त्याला मात्र सोडू नका, असे आवाहन त्यांनी केले. माझ्याकडे 334 जाती आहे. आम्ही जातीचे प्रतिनिधीत्व करत नाही, आम्ही प्रवर्गाचे प्रतिनिधीत्व करतो. परंतु, जरांगे केवळ एकटा बोलतो, एका जातीपुरता बोलतो. आम्ही 54 टक्के आहोत. जातनिहाय जनगणना करा, अशी आमची मागणी आहे.जसे महायुतीच्या नेत्यांना टारगेट केले जाते. तसाच सवाल जरांगे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना देखील विचारला पाहिजे, पण यांना राजकारण करायचं आहे. कोणाच्या तरी आडून विरोधकांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला. आरक्षण म्हणजे काय हे जरांगेंना देखील समजते का, हजारो वर्षे जे मागास आहे, त्यांना पुढे आणण्यासाठी हे आरक्षण आहे. आरक्षण हे आर्थिक स्थितीवर नसते. जे सामाजिक स्थितीवर आरक्षण असते. सगेसोयरे यावर आडून बसले. आरक्षण सगेसोयऱ्यांना देता येणार नाही. कारण भारतात पितृसत्ताक पद्धत आहे. वडीलांचे नाव लावले जाते. अनेक निवृत्त न्यायमूर्तींना मी ये विचारून बोलत आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राला प्रबोधन चळवळीचा वारसा आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन छत्रपती महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं. त्यांच्या स्वराज्यात सर्वांना समान स्थान होत. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते. त्यात अंगरक्षकही होते. त्यांनी हिंदू मुस्लिम यासह सर्व लहान सहान जातींना त्यांनी सोबत घेऊन राज्य केलं. आता मात्र काही लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि आपल्याच लोकांना मारतात. त्यांनी अनेकांची घरे जाळली, हॉटेलची जाळपोळ केली, अनेकांना मारहाण केली. हे कशासाठी करताय. तुम्हाला आरक्षण हवय ते कायद्याने घ्या. आमचा कुठलाही विरोध नाही. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या हीच मागणी असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
छगन भुजबळ म्हणाले की, काही लोक भुजबळांनी सर्व आरक्षण खाल्ल असे म्हणताय त्यांना मला सांगायचं आहे. ओबीसींची संख्या ही 54 टक्के आहे. त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना करावी अशी आपली मागणी आहे. जनगणना केली तर सर्वच प्रश्न सुटतील सर्वांना न्याय मिळेल. घाई घाईने भाटिया कमिशनने केलेले सर्वेक्षण आम्ही मान्य करत नाही. बिहार सारख्या राज्यात आम्ही 60 टक्याहून अधिक आहोत. ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण दिलं आहे. त्यातील केवळ 9.5 टक्के जागेवर ओबीसींना संधी मिळाली आहे. त्यामुळे आमचा बॅकलॉक किती मोठा आहे तो आधी भरला जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तोडगा काढण्यासाठी शरद पवारांची भेट
छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आपण शरद पवार साहेबांची भेट घेतली. अनेकांनी यावर वेगवेगळी चर्चा केली त्याची आपल्याला फिकीर नाही. आपला हा महाराष्ट्र संपूर्ण देशाला दिशा देतो. हा महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे यासाठी आपले प्रयत्न आहे. त्यामुळे आपण पवार साहेबांची भेट घेतली. त्यांनीही त्याला सकारात्मकता दर्शवली त्यानंतर त्यांच्याकडून देखील यावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचे सांगत महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा या पंक्तीतून त्यांनी राज्यात शांतता राहीली पाहिजे याकडे सर्वांचे लक्ष वेधले