मएसो सिनियर कॉलेज, डिक्की (DICCI) नेक्स्ट जेन, लघुउद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन‘उद्यमी संवाद – ‘कथा उद्योगाची प्रवास उद्योजकाचा’ भाग ३
पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बेरोजगारी वाढणार आहे. नोकऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे यापुढेही नोकऱ्या कमी होणार आहेत. उद्योजक होण्यासाठी आपल्याकडे अनेक संधी उपलब्ध आहेत त्यामुळे कोणताही कमीपणा किंवा मोठेपणा न बाळगता उद्योजकतेकडे तरुणांनी वळले पाहिजे, असे मत, सीनर्जी इन्फ्रासिस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड चेअरमन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी व्यक्त केले.
मएसो सिनियर कॉलेजच्या आंत्रप्रेन्यूअर डेव्हलपमेंट सेल आणि डिक्की (DICCI) नेक्स्ट जेन आणि लघु उद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्यमी संवाद – ‘कथा उद्योगाची प्रवास उद्योजकाचा’ या विशेष मुलाखतपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. कोथरूड मधील मएसो सभागृहात हा कार्यक्रम झाला. म.ए.सो. नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. राजीव हजरनीस, विजय भालेराव, म.ए.सो.सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ.पूनम रावत, स्टार्टअप इनोव्हेशन सेल समन्वयक प्रा. निलेश यादव, वैचारिक किडा चे सर्वेश देशपांडे यावेळी उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र हिरेमठ म्हणाले, नोकरी मिळवण्यापेक्षा उद्योजक बनणे सोपे आहे. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत अशा अनेक योजना आपल्याकडे आहेत. जर उद्योगाचा आराखडा तयार असेल तर पैशांमुळे कुठेही अडणार नाही. उद्योजकांना बळ देण्यासाठी अनेक सरकारी संस्था देखील आहेत.
कोणताही उद्योग करायचा ठरवला आणि जे ध्येय ठरवले आहे ते गाठणारच, असा आत्मविश्वास ठेवला तर नक्कीच यशस्वी उद्योजक तयार होतील. योग्य आर्थिक व्यवस्थापन आणि उद्योगाच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचे आहे हे माहीत नसल्यामुळे अनेक उद्योग यशस्वी होतात. त्यामुळे या दोन गोष्टींचा बारकाईने विचार होणे गरजेचे आहे. असेही त्यांनी सांगितले.
वैचारिक किडा चे सर्वेश देशपांडे यांनी मुलाखत घेतली. वैचारिक किडा विशेष सहकार्य कार्यक्रमाला मिळाले.

