पुणे – पोलिस दलातील कुटुंबीयांच्या विविध समस्या व अडचणींसंदर्भात विचारविनिमय करून मार्ग काढण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने एक समन्वय समिती स्थापन केली आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची या समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समितीचे अध्यक्ष असतील.
महाराष्ट्रातील पोलिस दलात एकूण सव्वादोन लाख पोलिस कार्यरत आहेत. पोलिस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण असतो, यामुळे त्यांना कुटुंबाला द्यावा लागणारा वेळ मर्यादित असतो. त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या कुटुंबीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पोलिसांचे, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचेही मनोधैर्य उंचावणे, त्यांना विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांच्या समस्यांची नोंद घेणे आवश्यक आहे. याचाच विचार करून देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली असून, यात १२ जणांचा समावेश आहे. या समितीत सिद्धार्थ शिरोळे यांचा समावेश आहे.
‘‘लहानपणापासून पोलिस लाईननजीकच वास्तव्यास असल्याने पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणार्या अनेक समस्यांविषयी माझ्याकडे बर्याच प्रमाणात माहिती आहे. पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या नोंदवून त्याच्या निराकरणासाठीचा रोडमॅप ठरविण्यासाठी अशा समितीची आवश्यकता होती,’’ असे सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘माझ्या मतदारसंघात तीन पोलिस वसाहती आहेत, तेथे जाऊन मी व्यक्तिशः माहिती घेणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार राज्यातील अनेक पोलिस वसाहतींपर्यंत पोहोचून एक सर्वंकश अहवाल तयार करून त्यांच्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी मी वचनबद्ध आहे.’’
पोलिसांची निवासस्थाने, त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्याचे प्रश्न जाणून घेणे आणि त्यांच्या कुटुंबातील तरुणांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही ही समिती काम करेल, अशी माहिती शिरोळे यांनी या वेळी दिली.