ब्लाऊज वेळेवर शिवून न देणाऱ्या एका लेडीज टेलरला ग्राहक मंचाने तब्बल 15 हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची घटना धाराशिव जिल्ह्यात घडली आहे. ग्राहक मंचाने या प्रकरणी टेलरला तक्रारदार महिलेचे ब्लाऊजही मोफत शिवून दिल्याचे निर्देश दिले आहेत . .
या संदर्भातील वृत्तानुसार, स्वाती प्रशांत कस्तुरे असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्यांनी जानेवारी 2023 मध्ये शहरातील नेहा संत नामक लेडीज टेलरकडे 2 महागडे ब्लाऊज शिवण्यासाठी टाकले होते. हे दोन्ही ब्लाऊज 6 हजार 300 रुपयांत शिवून देण्याचे ठरले होते. त्यापैकी 3 हजार स्वाती कस्तुरे यांनी टेलरला आगाऊ रक्कम म्हणून दिली. उर्वरित पैसे ब्लाऊज शिवल्यानंतर द्यायचे होते.पण नेहा संत यांनी वेळेवर ब्लाऊज शिवून दिले नाही. त्यांनी या प्रकरणी फोन, मेसेजद्वारे वेळोवेळी नेहा संत यांच्याशी संपर्क साधला. पण संत यांनी नेहमीच वेळ मारून नेली. अखेर कस्तुरे यांनी वकील प्रशांत कस्तुरे यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली. त्यानंतर मंचाने नेहा संत यांना नोटीस बजावली. पण त्यांनी या नोटीसीला दाद दिली नाही.अखेर मंचाने 15 जुलै 2024 रोजी एकतर्फी आदेश पारित करत नेहा संत यांना 10 हजार रुपयांचा दंड तथा तक्रारीचा खर्च म्हणून 5 हजार रुपये तक्रारदार स्वाती कस्तुरे यांना देण्याचा आदेश दिला. एवढेच नाही तर मंचाने नेहा संत यांना तक्रारदार महिलेची दोन्ही ब्लाऊज मोफत शिवून देण्याचे निर्देशही दिलेत. ग्राहक मंचाच्या या दणक्याने एका दुकानदाराला अद्दल घडल्याने ग्राहकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.