पुणे-या पूर्वी १९९७ सर्वात जास्त ९०,५७०, २००५ साली ५१,८२५, २००६ साली ५६६३० आणि २०११ साली ६७,२१२ असा विसर्ग झाला. परंतु फक्त ३५,०००क्यूसेक च्या विसर्गाने अत्यंत भीषण रूप धारण केले, हाहाकार माजला याला नदीपात्रात झालेली अतिक्रमणे,मेट्रो , नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत सुरु असलेलेनदीचा गळा घोटणारे बेजबाबदार कामच कारणीभूत असल्याचा आरोप करणारे एक पत्र माजी खासदार वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे
या पत्रात वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे कि,’ मागील आठवड्यात, दि २५ जुलै रोजी पुण्यामध्ये झालेल्या पावसामुळे हाहाकार माजला. शहरात बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन, लोकांच्या घरात पाणी घुसले, घरातील वस्तूंचे नुकसान झाले, वाहने वाहून गेली किंवा पाण्यात अडकल्यामुळे नादुरुस्त झाली, अनेकांना स्थलांतरित व्हावे लागले, प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले, तीन निष्पाप जीव इलेक्ट्रिक शॉक मुळे मृत्यूमुखी पडले. ह्या अगोदर पुण्यामध्ये याहीपेक्षा उच्चांकी पाऊस पडल्याच्या नोंदी आहेत.(२५ जुलै २०२४ -११४.1mm; २०१० मध्ये १८१.१ mm; जून २०२३ मध्ये १२०.५ mm) https://indianexpress.com/article/cities/pune/rain-pune-flash-flood-videos-9373410/
कोरेगाव पार्क परिसरात नदी काठाला चालू असलेल्या महानगरपालिकेच्या नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत, बेजबाबदारीने केलेल्या कामांमुळे काही इमारतींच्या संरक्षक भिंती वाहून गेल्या आणि जमिनीला मोठे तडे गेले आहेत, इमारतीच्या खालची माती वाहून गेल्याने इमारतीला धोका निर्माण झाला आहे. महानगरपालिकेने ह्या इमारती धोक्याच्या झाल्या असल्याचे कळविले आहे.
पुण्याचा वाढता पाऊस, या पूर्वीचे ढगफुटी चे प्रकार लक्षात घेता, महानगरपालिका व संबंधित शासकीय यंत्रणेने सज्ज राहणे अपेक्षित होते, मात्र धरणातून रात्री सोडलेल्या पाण्याचा इशारा नागरिकांना दिला गेला नाही- रात्रीच्या वेळात विसर्ग वाढल्याने नागरिक झोपलेले असताना त्यांच्या घरात पाणी शिरू लागले. स्मार्ट सिटी अंतर्गत, नागरिकांच्या करातून लाखो रुपये खर्च करून बसवलेले, पूर परिस्थितीत माहिती पुरवणारे सेन्सर्स आणि पब्लिक अलार्म यंत्रणा का इशारा देऊ शकल्या नाही असा प्रश्न आम्हा पुणेकर नागरिकांना पडला आहे. या सर्व घटनांना प्रशासन जबाबदार असून संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे, न झाल्यास लोकांच्या, म्हणजेच सर्वसामान्य पुणेकरांच्या जीवाची संबंधित सरकारी यंत्रणेला परवा नाही असाच आमचा ठाम समज होईल.
दि २५ रोजी धरणातून ३५,००० क्यूसेक चा विसर्ग झाला. या अगोदर १९९७ सर्वात जास्त ९०,५७०, २००५ साली ५१,८२५, २००६ साली ५६६३० आणि २०११ साली ६७,२१२ असा विसर्ग झाला. परंतु फक्त ३५,०००क्यूसेक च्या विसर्गाने अत्यंत भीषण रूप धारण केले. म्हणजेच नदी मध्ये झालेली अतिक्रमणे ही या भीषण परिस्थतीला कारणीभूत असल्याचे स्पष्ट दिसून येते. मेट्रोचे नदीपात्रातील मोठे मोठे स्तंभ खांब नदी सुधार योजने अंतर्गत काठाला विकसित करण्यासाठी प्रचंड प्रमाणात वापरलेला दगड, मुरुम व राडारोडा नदीपात्रात रास्ता करता येणार नाही असा आदेश असून देखील विकसित होत असलेला १०० फुटी नदीपात्रातील रस्ता व त्यासाठी टाकलेली प्रचंड भर- नदीपात्रात कुठल्याही वाहिनीचे काम करताना घातलेली भर त्याच ठिकाणी पसरणे, शहरात निर्माण होणाऱ्या राडारोड्याला ठराविक जागा न पुरवल्यामुळे रात्री अनधिकृत पणे टाकलेल्या राडारोड्याला थांबिवण्याचे यंत्रणा नसणे या व अश्या कारणाने नदीची वहन क्षमता, जी १,००,००० क्यूसेक पाणी वाहून न्हेण्याची असणे अपेक्षित आहे, कमी झाल्याचे स्पष्ट दिसून येते. पुण्यातील तज्ज्ञ – अभ्यासक व आम्ही काही जणांनी वरील नमूद केलेल्या चुकीच्या कामांबाबत कायम आवाज उठवला आहे, परंतु प्रशासनाने ह्या मुद्द्यांकडे कानाडोळा केला आहे. विकास कामांमध्ये लोकांचा सहभाग असावा भरीव सूचना द्याव्यात हे केवळ कागदवारच रहात असून, दुर्दैवाने प्रशासन आपल्या मनमानी पद्धतीने कामे रेटत आहे, ज्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. आपणांस विनंती कि, १) नदी सुशोभीकरणाच्या कामासाठी तज्ज्ञांची विशेष समिती स्थापन करून सदर प्रकल्पासंदर्भात अभ्यासकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा विचार करून आढावा घ्यावा आणि त्यानंतरच प्रकल्पासंबंधी योग्य तो निर्णय घ्यावा. तो पर्यंत काम स्थगित ठेवावे. २) नदीबाबत कुठल्याही कामांसंदर्भात शासनाने ‘प्रोटोकॉल्स’ तयार करावे ज्या मध्ये शाश्वत विकास आणि वातावरण बदलाचे मुद्दे व नदी संदर्भातील विकासाच्या विविध मुद्द्यांचा अंतर्भाव असेल ३) शहरात निर्माण होणारा राडारोडा टाकण्यासाठी, जागा नेमून देऊन तो इतर ठिकाणी टाकला जाणार नाही या साठी कडक अंमलबजावणी करण्यास महापालिकेला सक्त आदेश द्यावेत ४) दि. २५ जुलै रोजी झालेल्या पूर परिस्थीला हाताळण्यात कसूर केलेल्या प्रशासनातील संबंधितांची चोकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी. आपण या मुद्द्यांकडे तातडीने लक्ष घालाल अश्या अपेक्षेत आहे.