मुंबई-आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुरेसे असल्याचा पलटवार भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेला इशारा भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बुधवारी येथील रंगशारदा सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा झाला. या मेळाव्याला संबोधित करताना ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. देवेंद्र फडणवीस यांनी मला व आदित्य ठाकरे यांना तुरुंगात डांबण्याचा डाव रचला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला ही गोष्ट सांगितली होती. आता एक तर तू राहशील किंवा मी राहीन. यापुढे हात उगारणाऱ्यांचा हातच जागेवर ठेवायचा नाही, असे ते यावेळी फडणवीस यांना इशारा देत म्हणाले होते. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या या टीकेचा समाचार घेतला आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिक धमकी दिली आहे. भाजप अशा धमक्यांना भीक घालत नाही. त्यांच्या या विधानावरून त्यांनी बाळासाहेबांचा वारसा सोडल्याचे स्पष्ट होते. त्यांचे विधान महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे नाही. सरकारने मराठवाड्यात सुमारे 20 हजार कोटींची गुंतवणूक केली. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी त्यांनी हे विधान केले असावे.
देवेंद्र फडणवीस हे अपप्रवृत्तीचे कर्दनकाळ आहेत. ते राज्यातील सर्वात लोकप्रिय असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. याऊलट उद्धव ठाकरे यांचे विधान सर्व परंपरा गुंडाळून ठेवून नाक्यावर व बांधावर बोलावे असे हमरीतुमरीचे विधान केले आहे. ज्या झाडाला फळ येतात त्यालाच लोक दगड मारतात, राज्यातील वांझोट्यांना कुणी दगड मारत नाही. वैफल्यातून ही भाषा आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, नडलो तर नडलो, पण स्वतः मात्र बेक्कार पडलो अशी उद्धव ठाकरे यांची गत झाली आहे. त्यांचे पूर्वी किती खासदार होते आणि आता किती आहेत? ते साफ अपयशी ठरलेत. याऊलट पंतप्रधान मोदी स्वतःच्या कर्तृत्वातून जनतेचे मन जिंकत आहेत. जनता विधानसभेला प्रत्युत्तर देईल. उद्धव ठाकरे स्वतः गुर्मीत बोलत आहेत. मुस्लिम व इतर मते मिळाली म्हणून त्यांच्या काही जागा आल्या. आता विधानसभेला मोदींची गरज नाही, तुम्हाला फडणवीस शिंदे हेच पुरेसे आहेत, असे ते म्हणाले.