मुंबई-आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडेल, अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने नवी मुंबईमधील वाशी येथे सामाजिक ऐक्य परिषद भरवली होती. या परिषदेला शरद पवार यांनी संबोधित केले. त्यांच्या या विधानाची जोरदार सुरू आहे. शिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी पवारांवर पलटवार देखील केला आहे.
शरद पवार म्हणाले, ”महाराष्ट्रात देशाला देशा दाखवणारे अनेक युगपुरुष जन्माला आले. त्यामुळे महाराष्ट्र अजून तरी स्थिर आहे. परंतु, आपल्याला देशातील परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जात पंथ, धर्म, भाषा या गोष्टी बाजूला सारून सर्वांनी एकसंघ समाज व एकसंघ राष्ट्र ही संकल्पना घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी ही ऐक्य परिषद मोलाची कामगिरी बजावेल, असं मला वाटतं”, असे पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर ते राज्य अस्थिर झाले आहे. परंतु, आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावे असे वाटले नाही. मोदींना मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावासा वाटला नाही. मणिपूरमध्ये घडलं तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये कर्नाटकातही घडले, त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असं काहीतरी घडेल अशी चिंता आता वाटू लागली आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेले आहेत. त्यांच्या विचारांमुळे आपलं राज्य वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रगती करत राहिलं आहे”, असेही पवार म्हणाले.
निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडवण्याची भाषा दरम्यान, त्यांच्या या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्ला चढवला आहे. बावनकुळे म्हणाले, ”निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार यांच्याकडून केली जात आहे. हे योग्य नाही. मात्र जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातील जनता दंगलीपर्यंत जाईल अशी परिस्थिती कधी नव्हती आणि होणारही नाही. पण काही लोक समाजात तेढ निर्माण करून अशी काही आंदोलने निर्माण करत आहेत. समाजाला विचलित ठेवण्याचे काम काही लोक करत आहेत”, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.