१६ प्रमुख नेत्यांना मुंबईतून विधानसभा लढण्याची तयारी करण्याचे आदेश
मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीला मागे टाकून आपल्या १६ प्रमुख नेत्यांना मुंबईतून विधानसभा लढवण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी, आ. प्रकाश सुर्वेंच्या मागाठाणे, आ. दिलीप लांडे यांच्या चांदिवली, आ. यामिनी जाधव यांच्या भायखळा आणि आ. सदा सरवणकर दादर या प्रमुख जागा आहेत. आदित्य ठाकरेंच्या वरळीतून त्यांनी आपले निकटवर्तीय संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. राज यांच्या या अचानक चालीने महायुती आणि महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी सांगितले की, शिवडीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यात आली आहे, सध्या येथे उद्धवसेनेचे अजय चौधरी आमदार आहेत. मुलुंडमध्ये सत्यवान दळवी, राजेश चव्हाण यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळेल. भांडुपमध्ये शिरीष सावंत, योगेश सावंत, संदीप जळगावकर, आतिषा माजगावकर यांना तयारी करण्यास सांगितले आहे. ऑगस्टमध्ये राज यांच्या दौऱ्यानंतर काही नावे बदलू शकतात. दरम्यान, राज यांनी २५० जागा लढण्याची घोषणा केली असली तरी त्यात बदल होईल, असे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.उद्धवसेनेचे राज्यसभा सदस्य आणि प्रवक्ते संजय राऊत यांचे बंधू सुनील विक्रोळीचे आमदार आहेत. राज यांनी विश्वजित ढोलम यांना तेथून निवडणूक लढवण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. भाजप आमदार राम कदम यांच्या घाटकोपर (पश्चिम) साठी गणेश चुक्कल, दिंडोशीतून भास्कर परब, चेंबूरमधून माउली थोरवे, दिंडोशीला उद्धवसेनेचे आमदार सुनील प्रभूंच्या विरोधात भास्कर परब आणि माहीममधून नितीन सरदेसाईंना तयारीचे आदेश देण्यात आले आहेत, असे एका मनसे नेत्याने सांगितले.

