मुंबई-शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटाने तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली आहे. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावलेंनी याचिका केली आहे. त्यांनी आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. आता याप्रकरणी न्यायालयाकडून 6 ऑगस्ट रोजी सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर ते डिसेंबर 2023 या कालावधीत शिवसेना आमदार अपात्रतेवर सुनावणी पूर्ण झाली. त्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी जाहीर केला. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना दिलासा देतानाच, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले नाही. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवल्यामुळे आता भरत गोगावलेंनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.दरम्यान, ठाकरे गटाच्या आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती गोगावलेंनी याचिकेत केली आहे. मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप घेण्यात आला आहे. सात महिन्यानंतर तातडीच्या सुनावणीचा आग्रह का केला जातोय? असे म्हणत उध्दव ठाकरे गटाचे वकील विनयकुमार खातू यांचा आक्षेप झाला आहे.
काय म्हटले आहे याचिकेत?
विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मनमानी, बेकायदा आणि असंविधानिक आहे. रेकॉर्डवर सादर करण्यात आलेले पुरावे विधानसभा अध्यक्षांनी विचारात घेतले नाही. इतकेच काय तर ठाकरे गटातील आमदारांनी स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले होते, हे लक्षात घेण्यात विधानसभा अध्यक्ष अपयशी ठरले, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने संविधानाचा मान राखला तर २४ तासात हे सर्व अपात्र ठरतील-संजय राऊत
दरम्यान, याप्रकरणी प्रसार माध्यमांशी बोलतांना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. शिंदे गटाचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव होणार आहे. आता धावाधाव करून काय मिळवणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने संविधानाचा मान राखला तर २४ तासात हे सर्व अपात्र ठरतील. शिंदे गटाचे पक्ष आणि चिन्ह गोठवले जाईल”, असे राऊत म्हणाले.

