छत्रपती संभाजीनगर-मराठा आरक्षणावरून एरवी सरकारसह सत्ताधारी नेत्यांना धारेवर धरणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रथमच विरोधकांना थेट आवाहन केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी थेट शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांचा उल्लेख करत मराठा आरक्षणाबाबत विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. तसेच याबाबत निर्णय न झाल्यास येत्या 29 ऑगस्टला मोठा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना हे विधान केले आहे.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले, आज मूळ गावी मातुरीमध्ये यात्रेसाठी निघालो आहे. आमचे मूळ गाव आहे तिथे दर्शनासाठी जाणार आहे. सरकारशी बोलणं झाले नाही, पाऊस सुरू आहे, सरकार त्यात व्यस्त आहेत. जनता अडचणीत असताना सरकारला त्रास देणे योग्य नाही. त्यामुळे आम्ही सरकारला त्रास देणार नाही. माझीही ताब्यात बरी नाही मात्र तरीही मी दर्शनाला जाणार आहे. मी माझ्या गावी जाणे आणि माझ्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही”, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.पुढे ते म्हणालेत की, मराठा समाजाला मोठं करायचे असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणार आहे. भाजपच्या लोकांचे डोके काम करत नाही. आम्ही सत्ताधाऱ्यांना भाव देत नाही. शेवटी मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचे राजकीय करिअर मराठा संपवून टाकेल. सरकारकडून हा विषय विरोधकांवर ढकलला जात आहे. उद्या विरोधक जर नाही म्हणाले तर आम्हाला सरकार आरक्षण देणार नाही का? एकमेकांवर ढकलणे त्यांनी बंद करावे”, असे जरांगे म्हणाले.तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करावी. मराठे समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकराने वाट बघू नये. सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा. उद्या विरोधक नाही म्हणाले तरी सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. राज्यातील मराठा समाज मग सरकारला डोक्यावर घेईल”, असे जरांगे म्हणाले.
29 ऑगस्टला मोठा निर्णय घेणार
याशिवाय आम्ही महाविकास आघाडी किंवा महायुतीचे विरोधक नाहीत. जे सत्य बोलेल त्यांच्या बाजूने आम्ही आहोत. आम्हाला राजकारणामध्ये पडायचे नाही, मात्र आमच्या मान्य झाल्या नाहीत, आरक्षण मिळाले नाही तर आमच्यासमोर पर्याय काय? त्यामुळे नाईलाजाने आम्ही २८८ पाडायचे की उभे करायचे याबाबत निर्णय घेणार आहोत. येत्या 29 ऑगस्टला याबाबत मोठा निर्णय घेणार आहे. 14 ते 20 ऑगस्ट उमेदवारांची यादी करू. 20 ते 27 ऑगस्टला या यादीवर चर्चा करू आणि 29 ऑगस्ट रोजी काय करायचं ते ठरवू” असे ते म्हणाले.

