पुणे, दि. २४: सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सेंटर फॉर युथ डेव्हलपमेन्ट अॅण्ड ॲक्टीव्हीटीज संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथी, पारलिंगी व्यक्तींना ओळखपत्र, प्रमाणपत्र तसेच नवीन मतदार ओळखपत्र नोंदणीकरीता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे आयोजित या शिबिरात ५४ तृतीयपंथी, पारलिंगी व्यक्तींची ओळखपत्रासाठी आणि २८ पारलिंगी व्यक्तींची नवीन मतदान ओळखपत्राकरीता नोंदणी करण्यात आली. तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याकरीता आवश्यक असणारे स्टॅम्प पेपर व नोटरीची मोफत सुविधा सहायक आयुक्त, समाज कल्याण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच सर्व नोंदणीकृत तृतीयपंथी व्यक्तींची प्रमाणपत्राकरीता https://transgender.dosje.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आली.
या शिबिराला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी अॅड. वसंत कांबळे, मंगलमुखी किन्नर चारिटेबल ट्रस्टच्या श्रीमती कादंबरी, सेंटर फॉर युथ डेव्हलपमेन्ट अॅण्ड एक्टीव्हीटीज संस्थेचे प्रतिनिधी प्रितेश कांबळे, मिलन लबडे, महर्षी कर्वे समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, तृतीयपंथी, पारलिंगी व्यक्ती उपस्थित होते.

