पुणे – महापालिकेच्या वाकडेवाडी कॉलनीतील इमारती सुरक्षित रहाव्या यासाठी प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना करेल, असे आश्वासन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी काल (शनिवारी) रहिवाशांना दिले.
पीएमसी कॉलनी वाकडेवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली, एका इमारतीच्या भिंतीचा एक भाग कोसळला. पण, कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, परंतु या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. ही घटना समजताच मी तात्काळ धाव घेतली, रहिवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. दुरुस्तीची तातडीची गरज ओळखून उपमुख्य मंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज मीना यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या, अशी माहिती आ.सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
कॉलनीतील दुरुस्ती आणि देखभालीचे काम उद्यापासून (सोमवार) सुरू करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी वॉर्ड अधिकाऱ्यांना दिले आहेत. मला आशा आहे की, पीएमसी कॉलनीचे रहिवासी लवकरच सुरक्षित वातावरणात राहू शकतील आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रशासन कायमस्वरूपी उपाय योजना करेल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

