आयुर्वेदाचार्य वैद्य रमेश नानल यांचे मत; प्राचीन संहिता गुरुकुलातर्फे ‘आचार्य’ पुरस्कार प्रदान
पुणे, ता. २०: “आयुर्वेद अथांग ज्ञानसागर असून, त्याविषयीच्या अभ्यास, संशोधन, चिंतन व मननाला शेवट नाही. निरंतर प्रवाही असलेल्या वाटेवर आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी संशोधनाची दृष्टी विकसित करावी. नेमके मापन, निदान, अचूक उपाययोजना यातून ज्ञानाचा व्यावहारिक आणि संशोधनात्मक वापर करावा”, असा सल्ला ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ रमेश नानल यांनी दिला. अनेक दुर्धर व्याधीवर उपचारासाठी आयुर्वेदाचाच आधार प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्राचीन संहिता गुरुकुल, केशायुर्वेद आणि कायायुर्वेद या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिग्गजांच्या मुलाखती’ या विशेष कार्यक्रमात नानल बोलत होते. वैद्य श्रीप्रसाद बावडेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी वैद्य नानल यांना ‘आचार्य’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमधील गणेश सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गुरुकुलमधील आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ‘आयुर्वेदाच्या क्षीरसागरातून’ या ग्रंथमालिकेअंतर्गत १६ पुस्तिकांचे प्रकाशन वैद्य नानल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त सुरेश मोहिते, संस्थापक वैद्य हरिश पाटणकर, वैद्य स्नेहल पाटणकर, वैद्य संतोष सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
वैद्य नानल यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासविषयाचे संपूर्ण आकलन झाल्याशिवाय जिद्द सोडू नका, असा सल्ला दिला. आयुर्वेदासारखा सखोल आणि गहन विषय समजून घेताना, विद्यार्थ्यांना शब्दांचे नेमके अर्थ, संदर्भ समजून घेणे गरजेचे असते. सूत्ररूप ग्रंथांचा अभ्यास करताना, शब्दांच्या अभिधा, लक्षणा, व्यंजना अशा शक्तींचा परिचय असावा लागतो. पूरक ग्रंथांचे परिशीलन आवश्यक असते. त्यातून विद्यार्थ्याची विश्लेषणात्मक दृष्टी तयार होते, असे त्यांनी नमूद केले.
‘आयुर्वेदाचा प्रचार प्रसार सर्वसामान्यांमध्ये होण्याच्या उद्देशाने आम्ही मधुजीवन या त्रैमासिकाची निर्मिती केली’, असे सांगून वैद्य नानल म्हणाले, ‘या त्रैमासिकाचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरातील अनेक राज्यांतून, प्रांतांतून आयुर्वेदाचे अभ्यासक, तज्ञ यातून लिहिते झाले. अनेकानेक विषय़ांवर विशेषांक प्रकाशित केले. हे सर्व अंक आजही आयुर्वेदाच्या अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना उपयोगी पडत आहेत. औषधनिर्माण क्षेत्रातील अर्क तसेच आसव यांच्या प्रयोगांचीही माहिती वैद्य नानल यांनी सांगितली.
वैद्य नीलेश ढवळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. वैद्य हरिश पाटणकर यांनी स्वागतपर प्रास्ताविकात मुलाखतीच्या आयोजनामागील हेतू विशद केला. विद्यार्थी लेखकांच्या वतीने वैद्य सुप्रिया क्षीरसागर आणि वैद्य आकांक्षा गुंड यांनी मनोगत मांडले. वैद्य आचल अपार यांनी सूत्रसंचालन केले.

