मुंबई-आम्हाला राजकारणाचे कोणतेही देणेघेणे नाही. पण जे सत्य आहे ते शंकराचार्यांना सांगावेच लागेल. असे म्हणत राजकारणात उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला,विश्वासघात करणारा खरा हिंदू नसतो. … केदारनाथ येथून 228 किलो सोने गायब झाले… अशी वक्तव्ये अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेवर बहिष्कार घालणारे ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी येथे केल्याने मोठी खळबळ उडाली
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी कुटुंबीयांसह पादुका पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. उद्धव ठाकरे यांनी अविमुक्तेश्वरानंद यांनी राम मंदिराच्या मुद्यावर घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले .अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा गत जानेवारी संपन्न झाला. या सोहळ्यावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यासह अन्य काही शंकराचार्यांनी बहिष्कार टाकला होता. सदर प्राणप्रतिष्ठा सोहळा शास्त्रानुसार होत नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी जोरदार समर्थन केले होते. या पार्श्वभूमीवर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.ठाकरे कुटुंबीयांनी केले पादुका पूजनशंकराचार्यांच्या भेटीमुळे ठाकरे कुटुंबीय भारावून गेले होते. उद्धव यांनी आपल्या पत्नी रश्मी तथा आदित्य व तेजस या दोन्ही मुलांसह पादुका पूजन करून अविमुक्तेश्वरानंद यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संवादही साधला. भेटीनंतर मातोश्रीबाहेर पडल्यानंतर अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाल्याचा आरोप केला.
मी ठाकरे कुटुंबीयांच्या विनंतीनुसार येथे आलो. त्यांनी माझे स्वागत केले. आम्ही सर्वजण हिंदू धर्म व सनातन धर्म पालन करणारे आहोत. आपल्याकडे पाप-पुण्याची भावना सांगण्यात आली आहे. गोहत्या हे सर्वात मोठे पाप आहे. पण त्याहून मोठा घात हा विश्वासघात आहे. हाच घात उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाला आहे. ही वेदना अनेकांच्या मनात आहे. ही वेदना उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होईपर्यंत दूर होणार नाही, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यावेळी बोलताना म्हणाले.
अविमुक्तेश्वरानंद यांनी यावेळी आमचेच हिंदुत्त्व खरे या एकनाथ शिंदे व भाजपच्या दाव्याचाही चांगलाच समाचार घेतला. कुणाचे हिंदुत्त्व खरे आहे हे माहिती करून घ्यावे लागेल. पण विश्वासघात करणारा हिंदू नसतो. पण विश्वासघात सहन करणारा मात्र निश्चितच हिंदू असतो. त्यामुळे विश्वासघात करणारे कसे हिंदू असतील? उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला. महाराष्ट्रातील समस्त जनतेला ही वेदना ठावूक आहे. निवडणुकीतही ही गोष्ट सिद्ध झाली आहे. सरकार पाडून जनमताचा अनादर करणे ही चांगली गोष्ट नाही, असे ते म्हणाले.
आम्हाला राजकारणाचे कोणतेही देणेघेणे नाही. पण जे सत्य आहे ते शंकराचार्यांना सांगावेच लागेल. आपल्याकडे विश्वासघात पाप मानले जाते. पाप व पुण्य हा धर्माचा मुद्दा आहे. त्यावर राजकारणी नाही तर केवळ धर्माचार्यच बोलतील, असेही अविमुक्तेश्वरानंद यावेळी बोलताना म्हणाले.
दिल्लीत केदारनाथ मंदिर बांधण्याच्या मुद्याचाही अविमुक्तेश्वरानंद यांनी यावेळी समाचार घेतला. आपल्याकडे 12 ज्योतिर्लिंग आहेत. केदारनाथ हिमालयात आहे. त्याला दिल्लीला नेण्याची काय गरज आहे. जनतेची दिशाभूल का केली जात आहे? जनतेची क्रूर थट्टा का केली जात आहे? केदारनाथ येथून 228 किलो सोने गायब झाले. पण मीडिया ते दाखवत नाही. त्याचा तपासही केला जात नाही. आता दिल्लीत केदारनाथ बांधून घोटाळा करत आहेत, असे ते म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी नुकतीच उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांची भेट घेतली होती. याविषयी बोलताना अविमुक्तेश्वरानंद यांनी यावेळी मोदी आपले शत्रू नसल्याचे स्पष्ट केले. आमचा नरेंद्र मोदींना विरोध नाही. ते आमच्याकडे आले होते. त्यांनी आम्हाला नमस्कार केला. आम्हीही त्यांना आशीर्वाद दिले. आम्ही त्यांचे शत्रू नाही. पण त्यांची चूक झाली की आम्ही बोलणारच, असे ते म्हणाले. भाजपने आमच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना कोणताही संदेश दिला नाही. आम्ही त्यांचे काही मध्यस्थ नाही, असेही अविमुक्तेश्वरानंद यावेळी उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार का? या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

