नवी दिल्ली, 14 जुलै 2024
आपल्या भारतीय हवाई दलाला 1999 च्या कारगिल युद्धात शौर्याने लढलेल्या शूर हवाई योद्ध्यांच्या शौर्य आणि बलिदानाचा अभिमानास्पद वारसा लाभला आहे. या योद्ध्यांचे बलिदान हा लष्करी हवाई वाहतुकीच्या इतिहासातील खऱ्या अर्थाचा मैलाचा दगड ठरला आहे. कारगिल युद्धातील हवाई दलाची कारवाई (ऑप सफेद सागर) म्हणजे आव्हानांवर मात करण्याच्या हवाई दलाच्या क्षमतेचा पुरावा आहे. या कारवाईच्या वेळी भारतीय हवाई दलाला 16000 फुटांपेक्षा जास्त उंचावरून उड्डाण करावे लागले होते, आणि त्यामुळे शत्रूला लक्ष्य करताना अत्यंत कठीण अडचणींचा सामना करावा लागला होता. आपल्या हवाई दलाने तंत्रज्ञानातील बदल वेगाने आत्मसात केले आहेत, आणि त्या सोबतच कार्यरत जवानांनी नोकरीवर असताना सातत्याने कठोर प्रशिक्षणही घेतले आहे. त्यामुळेच जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमीवर लढलेले हे युद्ध जिंकण्याचे समर्थ भारतीय हवाई दलाला प्राप्त झाले. भारतीय हवाई दलाने आजवर एकूण 5000 लढाऊ मोहिमा, 350 टोही/ एलिंट मोहिमा आणि सुमारे 800 आपत्कालीन परिल्थितील बचाव मोहिमांसाठी उड्डाणे केली आहेत. याशिवाय हवाई दलाच्या मार्फत आपत्कालीन परिल्थितील बचाव, जखमींची सुटका आणि हवाई वाहतूकीशी संबंधित इतर मोहिमांसाठी 2000 पेक्षा जास्त हेलिकॉप्टर उड्डाणे देखील केली गेली आहेत.
कारगिल विजयाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूर वीरांचा सन्मान करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या वतीने 12 जुलै ते 26 जुलै या कालावधीत हवाई दलाच्या सरसावा इथल्या तळावर ‘कारगिल विजय दिवस रौप्य महोत्सवी जयंती’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 1999 च्या कारगिल युद्धात राबवलेल्या ऑपरेशन सफेद सागरमध्ये भारतीय हवाई दलाच्या सरसावा इथल्या तळावरील हेलिकॉप्टरच्या 152व्या तुकडीने, तसेच मायटी आर्मर विमानांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. 28 मे 1999 रोजी हेलिकॉप्टरच्या 152व्या तुकडीचे स्क्वाड्रन लिडर आर आर पुंडीर, लेफ्टनंट एस मुहिलन, सार्जंट पीव्हीएनआर प्रसाद आणि सार्जंट आर के साहू यांच्यावर तोलोलिंग येथील शत्रूच्या तळांवर थेट हल्ला करण्यासाठी ‘नुब्रा’ फॉर्मेशनमधील उड्डाण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हा हल्ला यशस्वीरित्या करून तळावर माघारी परतत असताना, त्यांच्या हेलिकॉप्टरला शत्रूच्या स्टिंगर क्षेपणास्त्राने टिपले होते, शत्रूच्या या प्रतिहल्ल्यात हवाई दलाची ही चार अनमोल रत्ने शहीद झाली होती. या शुर विरांच्या असाधारण शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर वायुसेना पदक (शौर्य) प्रदान केले गेले. या चारही जणांनी देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानामुळे हवाई दलाच्या इतिहासात त्यांचे नाव कायम कोरले गेले आहे.
काल 13 जुलै 24 रोजी हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी हवाई दलाच्या तळावरील युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देश सेवेसाठी प्राणांची आहुती दिलेल्या सर्व हवाई योद्ध्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेक वरिष्ठ मान्यवर, शूर वीरांचे कुटुंबीय, माजी सैनिक आणि हवाई दलात कार्यरत असलेले असंख्य अधिकारीही उपस्थित होते. यावेळी हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी शहीदांच्या कुटुंबियांचा सत्कार करून त्यांच्याशी संवादही साधला.
यानिमीत्ताने हवाई दलाच्या वतीनं रोमहर्षक हवाई प्रात्यक्षिकांचंही आयोजन केले गेले होते. यात हवाई दलाच्या आकाशगंगा या पथकाने तसेच जग्वार, सुखोई – 30 एमकेएल आणि राफेल लढाऊ या लढाऊ विमानांनी आपली चित्तथरारक हवाई कौशल्ये सादर केली. शहीद वीरांच्या स्मरणार्थ भारतीय हवाई दलाच्या एमआय – 17 व्ही 5, चित्ता, आणि चिनूक या हॅलिकॉप्टर्सनेही उड्डाण करत प्रात्यक्षिक केले, त्याचबरोबर हवाई दलाचे लढाऊ पथक आणि बँडनेही सादरीकरण केले.
या कार्यक्रमाला रुरकी, डेहराडून आणि अंबाला इथल्या शाळांमधील मुलांसह, सहारनपूर परिसरातले स्थानिक रहिवासी, माजी सैनिक, नागरी मान्यवर आणि संरक्षण दलाच्या आस्थापनांमधील कर्मचारी यांच्यासह पाच हजारांपेक्षा जास्त जण उपस्थित होते.