पुणे-‘स्वच्छंद ॲडव्हेंचर फाऊंडेशन’च्या ४ गिर्यारोहकांनी ९ जुलै रोजी सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी लडाखमधील ‘माऊंट पोलोगोंगका’ या ६,४०५ मीटर उंचीच्या शिखरावर यशस्वीरीत्या चढाई करत शिखरमाथा गाठला.माऊंट पोलोगोंगका हे लेह-लडाख प्रांतातील त्सोकर तलावाजवळील ६,४०५ मीटर उंचीचे हिमाच्छादित शिखर आहे. त्सोकर व चुमाथांग या दोन खोऱ्यांमधील डोंगररांगेतील माऊंट पोलोगोंगका हे सर्वोच्च शिखर असून यावरील चढाई मार्गाची अत्यंत अल्प माहिती उपलब्ध आहे.
‘स्वच्छंद ॲडव्हेंचर फाऊंडेशन’तर्फे या शिखर चढाईची मोहीम चार महिन्यांपुर्वीच निश्चित करण्यात आली होती. २३ जून रोजी डॉ मिलिंद ढमढेरे व डॉ सुमित मांदळे यांच्या हस्ते मोहिमेचा फ्लॅग ऑफ झाला आणि २९ जून रोजी स्वच्छंद चा ७ गिर्यारोहकांचा संघ पुण्याहून रवाना झाला होता. मनालीच्या पुढे लाहौल भागातील किलॉंग येथे अतिऊंचीवरील वातावरणाशी मिळतं-जुळतं होण्यासाठी (acclimatisation) संघाने दोन दिवस बिलिंग नाला व शशुर गोंपा या ठिकाणी क्रमशः ७५० मीटर व ३६५ मीटर चढाई केली. तिथून पुढे ५ जुलै ला त्सोकर तलावापासून १२ किलोमीटर अंतरावर असणा-या माऊंट पॉलोगोंगका शिखराच्या पायथ्याशी ४,९०० मीटर उंचीवर संघाने बेस कॅम्प प्रस्थापित केला.
७ जुलै रोजी संपूर्ण संघाने ५,४०७ मीटर उंचीवरील कॅम्प १ गाठला. त्यापुढे ५,९०० मीटर उंचीवर समीट कॅम्प लावायचा संघाचा मानस होता परंतु यंदा या भागात नेहमीपेक्षा कमी बर्फवृष्टी झाल्यामुळे प्रस्तावित समीट कॅम्पच्या ठिकाणी पाण्याच्या आभावाची समस्या निर्माण झाली होती. समीट कॅम्प साठी दुसरी कुठलीच योग्य जागा न मिळाल्यामुळे संघाने कॅम्प १ वरून १,००० मीटरची चढाई करून थेट शिखरमाथा गाठण्याचा निर्णय घेतला. यामुळे ही चढाई अधिक आव्हानात्मक झाली.
९ जुलै रोजी पहाटे १:३० वाजता हाडं गोठवणाऱ्या थंडीत संघाने या खडतर चढाईला सुरुवात केली. शिखरमाथ्याजवळील १५० फुटांची एक अवघड हिमभिंत चढून गेल्यानंतर पुढे आणखीन दोन उंचवटे पार करत गाईड स्तांझिन, फुनसुख व नवांग यांच्या मदतीने तृप्ती जोशी, केदार नरवाडकर, चैतन्य सहस्रबुद्धे व अनिकेत कुलकर्णी यांनी सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी ६,४०५ मीटर उंचीवरील माऊंट पॉलोगोंगका शिखराचा सर्वोच्च माथा गाठून तिरंगा फडकावला. तसेच संघातील अन्य सदस्य जितेन्द्र बंकापुरे, संदीप पाटील व क्षितिज तारकर यांनी प्रयत्नांची शर्थ करत ६,२२५ मीटरपर्यंत मजल मारली. १३ तासांच्या अथक परिश्रमांनंतर दुपारी २:३० वाजता संघ सुखरूपपणे कॅम्प १ ला पोहोचला. १० जुलै ला बेस कॅम्प गाठून पुढे संघ लेह मध्ये परतला. या मोहिमेला लेह मधील’चो एक्सपिडीशन्स’ या संस्थेने तांत्रिक साहाय्य केले.
“आयुष्यातली पहिली मोहीम असूनही कुठेही हार न मानता ६,२२५ मीटरपर्यन्त मजल मारू शकलो ही निश्चितच माझ्यासाठी कौतुकाची बाब आहे”, असे मनोगत जितेन्द्र बंकपुरे यांनी व्यक्त केले. तर प्रथमच ६००० मीटरहून अधिक उंचीचे शिखर यशस्वीरीत्या सर करण्याचा आनंद अवर्णनीय आहे असे संघातील सर्वांत वरिष्ठ सदस्य चैतन्य सहस्रबुद्धे यांनी सांगितले. १९ वर्षांचा क्षितिज तारकर मोहिमेतील सर्वात तरुण सदस्य ठरला.
“ही मोहीम नवोदित गिर्यारोहकांना एक उत्तम संधी व अनुभव देण्यासाठीच आखण्यात आली होती. ७ गिर्यारोहकांच्या संघातील ५ जणांची ही पहिलीच मोहीम होती. यातील चार सदस्यांनी यशस्वीरित्या माथा गाठला तर उर्वरित तिघांनी आपल्या पहिल्याच मोहीमेत ६,२२५ मीटर उंचीपर्यंत चढाई केली. या मोहिमेमध्ये सर्व नवोदित सदस्यांना गिर्यारोहणातील मूलभूत तत्त्वांचा उत्तम प्रत्यय आला. संपूर्ण संघ सुखरूप लेह ला परतला. संघाची एकंदरीत कामगिरी बघता या मोहिमेचे उद्दिष्ठ साध्य झाले”, असे मत मोहिमेचे नेते व स्वच्छंदचे संस्थापक-संचालक अनिकेत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

