भाजपच्या संथ कारभाराचा प्रवाशांना मनःस्ताप
पुणे – प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लोहगाव विमानतळावर येथे टर्मिनल २ उभे केले. परंतु, ते चालू करण्यास सत्ताधारी भाजपने एक वर्षाचा विलंब लावला त्यामुळे विमान प्रवाशांना त्याचा नाहक त्रास झाला, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांमुळे आणि माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या प्रेरणेने पुण्यात आयटी हब उभे राहिले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी या प्रकल्पाला चालना दिली. तसेच पुण्यात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी जवाहरलाल नेहरू शहर पूनर्निमाण योजनेतून पुण्याला भरभक्कम निधी दिला. यामुळे उद्योजक, मोठे व्यवसायिक आणि पर्यटक पुण्याकडे आकर्षित झाले. यातून विमानसेवा विस्ताराची गरज वाढली. साधारणतः एक कोटी प्रवासी वर्षाकाठी प्रवास करू लागले. त्यांच्या सोयीसाठी टर्मिनल २ उभारणीची गरज निर्माण झाली आणि ऑगस्ट २०२३ मध्ये टर्मिनल २ उभारणीचे काम पूर्ण झाले.
वास्तविक पाहता ऑगस्ट २३ मध्येच टर्मिनल २ कार्यन्वित होणे अपेक्षित होते. विमानतळ प्रशासनाची त्या दृष्टीने तयारीही झाली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करून भाजपला एक ‘इव्हेंट’ साजरा करायचा होता. याकरिता पंतप्रधानांची तारीख मिळत नसल्याने साडेपाच हजार कोटी खर्चून उभे केलेले टर्मिनल अक्षरशः पडून होते. हे लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने २३ सालातील डिसेंबर महिन्यापासून टर्मिनल सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला. तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्यजी शिंदे यांना पत्र पाठविली, निवेदने दिली. दिनांक २० डिसेंबर २३ रोजी नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र पाठवून टर्मिनल उदघाटनात टाळाटाळ होत असल्याचा निषेध केला, आंदोलन केले. त्या आंदोलनाला यश मिळाले आणि मंत्र्यांनी विमानतळाची पहाणी करून १९ फेब्रुवारी रोजी उदघाटन होईल, असे जाहीर केले. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. पंतप्रधान मोदी यांना ही तारीख सोयीची नसल्याने उदघाटनाचा ‘मुहूर्त’ पुन्हा एकदा टळला. त्यानंतर थोर समाजसुधारक कै.गणेश वासुदेव जोशी तथा सार्वजनिक काका यांच्या पुतळ्यासमोर दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी काँग्रेस पक्षाच्यावतीने माझ्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. मार्च महिन्यात ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधानांनी टर्मिनलचे उदघाटन केले. पण, त्याचवेळी टर्मिनल लगेचच कार्यान्वित होणार नसल्याचे स्पष्ट झाले. पंतप्रधानांच्या उदघाटन इव्हेंटचा काँग्रेस पक्षाने निषेध केला.
काँग्रेस पक्षाने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सत्ताधारी भाजपला जाग आली आणि आता मोठ्या गाजावाजा करत टर्मिनल २ कार्यान्वित करण्यात येत आहे, अशी टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

