मुंबई-मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीवर काँग्रेसने बहिष्कार टाकला. विधानसभेत भर सभागृहातच आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पण राज्य सरकारने ती मागणी मान्य न केल्यामुळे काँग्रेसने या बैठकीवर बहिष्कार टाकला. यानंतर महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीदेखील या बैठकीवर बहिष्कार टाकला.
महाराष्ट्र पेटत राहिला पाहिजे अन् त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतली पाहिजे, अशीच भूमिका ही विरोधकांची दिसून येते, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठा आरक्षण व सगेसोयरे या मुद्द्यांवरून आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मविआकडून ऐनवेळेवर बहिष्कार टाकला गेल्यावर फडणवीसांनी त्यांच्यावर निशाणा साधला. तर सलोख्याची भूमिका घेतली जावी, अशी भूमिका घेणारे शरद पवार साहेब देखील बैठकीला आले नाहीत, याचे देखील आम्हाला नवल वाटते, असाही टोला फडणवीसांनी लगावला.
मराठा आरक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने ठरवून 6 वाजता बैठकीवर बहिष्कार टाकला . पण विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्या घरी बसून निवडणुकीची बैठक करत आहेत. यावरून स्पष्ट होते की, विरोधकांच्या मते त्यांच्यासाठी कोणताच समाज महत्वाचा नाही. त्यांना केवळ निवडणुका महत्वाच्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी सूचना मांडली आहे की, विरोधक असो सत्ताधारी असो, त्यांनी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका लेखी मांडावी. यावर मुख्यमंत्री योग्यप्रकारे निर्णय घेतील. महाराष्ट्रात जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे हाच या बैठकीचा उद्देश होता. महाराष्ट्र शांत करावा आणि प्रश्न सुटावा हा बैठकीचा हेतू आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. परंतु महाराष्ट्र पेटत राहिला पाहिजे अन् त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतली पाहिजे, अशीच भूमिका ही विरोधकांची दिसून येते, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे मुद्दे चर्चीले गेले. त्यावर प्रत्येकाचे मत आम्ही जाणून घेत आहोत. त्यावर योग्य तो निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असा माझा विश्वास आहे. सर्व समाजाला घेऊन चालणे हाच आमचा उद्देश आहे.

