पुणे प्रार्थना समाजाच्या भांडारकर आश्रम निवास प्रकल्पाचा शुभारंभ–
प्रार्थना समाजाचा प्रवास हा सनातनी विरोधात किंवा त्यांना मोडून काढणारा नव्हता तर तो विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालणारा होता–
समाजातील सर्वांनी आपण एक आहोत हे मान्य करायला हवे
पुणे : प्रार्थना समाजाचा प्रवास हा सनातनी विरोधात किंवा त्यांना मोडून काढणारा नव्हता तर तो विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालणारा होता. पुणे प्रार्थना समाजातील जी मूल्ये आहेत, ती शाश्वत मूल्ये आहेत. आपल्या संस्कृतीने दुसऱ्यांची मंदिरे तोडा, असे शिकवले नाही. आपल्या वेदांमध्ये आपण सगळे एकच आहोत, असे सांगितलेले आहे. फक्त ते समाजातल्या सगळ्यांनी मान्य करायला हवे, असे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पुणे प्रार्थना समाजाच्या ‘भांडारकर आश्रम निवास’ या प्रकल्पाचा शुभारंभ खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाला. यावेळी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, संस्थेच्या अध्यक्षा डाॅ. सुषमा जोग, सचिव डाॅ. दिलीप जोग उपस्थित होते. डाॅ. भांडारकर यांची जयंती व लवकरच येणाऱ्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने भूपाल पटवर्धन यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमात प्रा. राजा दीक्षित, अभिजित जोग, हुलगप्पा नीलगल यांना प्रार्थना समाजाला दिलेल्या योगदानाबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच “प्रमोद व परिमल चौधरी शैक्षणिक व संशोधन फाउंडेशन ” यांच्या देणगीतून शैक्षणिक अनुदानाचे वितरण झाले.
डाॅ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, स्मृतींमध्ये सांगितले आहे की तुम्ही जन्मतः शूद्र असता आणि शिकल्यानंतर तुम्ही वर जाता. आपल्या संस्कृतीत अध्यात्म आणि विज्ञान पूर्वीपासून एकत्रच होते. पूर्वीचे ऋषीमुनी विज्ञानवादी होते.
भूपाल पटवर्धन म्हणाले, ज्ञानमार्गाकडून जाणारा जो अध्यात्माचा मार्ग असतो तो अंधश्रद्धेकडे जात नाही. भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग यांचा समन्वय आवश्यक आहे. धर्म आणि रिलीजन यामध्ये फरक आहे. धर्म हा व्यापक आहे त्यामध्ये संस्कृती येते. हिंदू ही प्रवाही संस्कृती आहे. प्रवाही समाज हा हिंदू संस्कृतीचा गाभा आहे. भक्ती, ज्ञान आणि कर्म याचा मेळ संत वाङ्ममयात दिसतो हाच मेळ न्यायमूर्ती रानडे आणि डाॅ. भांडारकर यांनी पुणे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून मांडला.
डाॅ. दिलीप जोग यांनी आपल्या प्रस्तावनेत प्रार्थना समाजाची आणि भांडारकर आश्रम निवास प्रकल्पाची माहिती सांगितली. डाॅ. सुषमा जोग यांनी प्रार्थना समाजाची “मानवता, समानता, आध्यात्मिकता, सत्कर्म, वैज्ञानिक दृष्टिकोन ” ही पंचसूत्री आणि भारतीय नागरिकांची सांविधानिक कर्तव्ये यांच्यातील साधर्म्याकडे लक्ष वेधले. डाॅ. शिल्पा मुजुमदार यांनी आभार मानले.

