आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके तरुण मंडळ यांच्यातर्फे व्याख्यानाचे आयोजन
पुणे : भारतावर इस्लामचे आक्रमण ७ व्या दशकाच्या सुरुवातीला झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी परिस्थितीमध्ये बदल होत गेला. मात्र, आधीच्या या १ हजार वर्षात इस्लाम आक्रमण सुरूच होते. तरी देखील हिंदू समाजाचा संघर्ष सुरु होता. अनेक देशात इस्लाम आक्रमणाने संपूर्ण समाज नष्ट झाले. हिंदू समाज नष्ट झाला नाही, हाच हिंदू प्रतिकाराचा इतिहास आपल्याला शिकवला जात नाही, अशी खंत भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी व्यक्त केली.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके तरुण मंडळ यांच्या वतीने सिंहगड रस्ता अभिरुची मॉल येथील सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा नेते सुनील देवधर, सुनील भिडे, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश असलेकर आदी उपस्थित होते.
प्रदीप रावत म्हणाले, मराठयांनी शेकडो विजय मिळविले. इस्लाम सत्तेचा पाया उखडला. शिवरायांचा हाच इतिहास आपल्याला तपशिलात शिकविला जात नाही. शिवरायांनी धार्मिक अत्याचार थांबविले. आज हिंदूंनी एकत्र यायला हवे. तरच, आजच्या काळातील समाजावरील धोके दूर होऊ शकतील.
सुनील देवधर म्हणाले, इंग्रजांनी शिक्षणात बदल करून आणि धर्मांतर करून देशावर राज्य केले. धर्म म्हणजे पूजा पद्धती नाही. तर, धर्म ही सगळ्यांना एकत्र जोडण्याची शक्ती आहे. त्यामाध्यमातून आपण एकत्र यायला हवे.
मंडळाचे अध्यक्ष प्रकाश असलेकर म्हणाले, मंडळातर्फे सन १९७० च्या दशकात तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रमांना सुरुवात केली होती. तसेच ५० वर्षांपूर्वी ३०० वा हिंदू साम्राज्य दिन शनिपार चौकात साजरा करण्यात आला होता. या उपक्रमास यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत, या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. हिंदूंनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असून त्याकरिता देखील काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.