पुणे : विठ्ठलभेटीच्या ओढीने कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करीत पंढरपूरला जाणा-या वारक-यांसाठी सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदाब, उच्च शर्करा यांसोबतच पायदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारख्या प्राथमिक आजारांची तपासणी शिबीरात करण्यात आली. यामध्ये तब्बल १५०० हून अधिक वारक-यांनी सहभागी होत आरोग्य तपासणी केली.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने मंदिरामध्ये वारक-यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल आदी उपस्थित होते. मागील ४ वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे.
जहांगिर हॉस्पिटल नेत्र तपासणी विभाग, सिल्व्हर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, श्री सत्य साई सेवा संघटना या संस्थांनी शिबीरात सक्रिय सहभाग घेत वारक-यांना सेवा दिली. तपासणी करुन वारक-यांना औषधे देखील देण्यात आली. तसेच पौष्टीक आहार म्हणून सर्व वारक-यांना राजगिरा लाडू देखील देण्यात आले.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, कान, नाक, घसा यांसह इतरही अनेक तपासण्या यावेळी करण्यात आल्या. तीन तज्ञ डॉक्टरांसह रुग्णवाहिकेमध्ये औषध वाटप करण्यात आले. ज्या वारक-यांना इतरही काही आजार आढळून आले, त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन डॉक्टरांनी दिले. पायी वारीच्या माध्यमातून विठ्ठलाची सेवा करणा-या वारक-यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
महालक्ष्मी मंदिरात १५०० वारक-यांची आरोग्य तपासणी
Date: