पुणे-पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लिझर लाऊंज (एल- 3) या ठिकाणी 23 जून राेजी मध्यरात्री ड्रग व मद्यपार्टी झाल्याचा प्रकार उघडकीस आला हाेता. त्यानंतर याप्रकरणात पोलिसांनी नऊ जणां विराेधात गुन्हा दाखल करुन आठ जणांना अटक केली आहे. तर, शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील दाेन बीट मार्शल, एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, एक पोलिस निरीक्षक यांचे निलंबन झाले असून हलगर्जीपणामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील एक निरीक्षक व एक दुय्यम निरीक्षक यांचे देखील निलंबन झाले आहे.
आता याप्रकरणात संबंधित एल -3 ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारुसाठा जप्त केल्याने व हाॅटेलचा परवानाकक्ष निलंबित केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी.बी.राजपुत यांनी दिली आहे.
राजपुत म्हणाले, संबंधित एल-3 हाॅटेल मधील प्रकार उघडकीस आल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. सदर पार्टीत ड्रगज सेवेन केल्याबाबत सत्यता पडताळणी करण्यासाठी पोलिसांचा स्वतंत्र तपास सुरु असून घटनास्थळावरील सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांनी तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे.
सदर हाॅटेलची तपासणी केली असता त्यात माेठया प्रमाणात विनापरवाना मद्यसाठा मिळून आला आहे. याप्रकरणात महराष्ट्र दारुबंदी कायदानुसार गुन्हा दाखल करुन सहाजणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण तीन लाख रुपये किंमतीचे 241 लिटर विदेशी मद्य व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर इमारतीतील तळमजला व पहिला मजल्यावर संताेष कामठे यांच्या नावाने हाॅटेल रेनबाे यात मद्यविक्री परवानाकक्ष अनुज्ञप्ती मंजुरी आहे. परंतु सदर परवानाकक्षात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी छुपा मार्ग काढून अनुज्ञप्तीच्या मंजुर नकाशात बदल केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत सखाेल निरीक्षण केले असता, या परवाना कक्षात गंभीर स्वरुपाची विसंगती आढळून आल्याने तसेच परवाना कक्षात अंर्तगत बदल केल्यामुळे सदर परवानाकक्ष जिल्हाधिकारी पुणे यांचे आदेशानुसार तात्काळ निलंबित करुन सील करण्यात आले आहे.