पुणे—एकम टेबल टेनिस अकादमीतर्फे आयोजित केलेल्या यंदाच्या तिसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील मुलांच्या गटात निषाद लेले मोहील ठाकूर व नक्ष महाजन हे विजेते ठरले तर मुलींमध्ये सई कुलकर्णी, नीरजा देशमुख व आहाना गोडबोले यांना अजिंक्यपद मिळाले.
ग्रॅव्हिटी क्रीडा संकुल, डांगी चौक (पिंपरी चिंचवड परिसर) येथे ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील पंधरा वर्षाखाली मुलांच्या गटात निषाद लेले याने विजेतेपद मिळवताना श्रेयस माणकेश्वर या तृतीय मानांकित खेळाडूवर ७-११,११-९,१२-१०,११-६ अशी चिवट लढतीनंतर मात केली. पहिली गेम गमावल्यानंतर लेले याने अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडवित विजय मिळवला. या आधी त्याने प्लेयर्स चषक स्पर्धेतही विजेतेपद मिळवले होते. तो सन्मय परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या १५ वर्षाखालील गटात सई कुलकर्णी या बिगर मानांकित खेळाडूने विजेतेपद मिळवित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तिने अंतिम लढतीत द्वितीय मानांकित खेळाडू नैशा रेवसकर हिच्यावर ४-११,१४-१६, ११-५,११-९,११-९ विजय मिळविला. उपांत्य फेरीत तिने अग्रमानांकित खेळाडू आद्या गवात्रे हिचे आव्हान संपुष्टात आणले होते. सई ही चॅम्पियन्स अकादमी सोमेन साहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
मुलांच्या तेरा वर्षाखालील खालील गटात मोहील ठाकूर याने या मोसमातील स्वतःचे तिसरे विजेतेपद नोंदविले. त्याने अंतिम सामन्यात शारंग गवळी याला ११-९,११-७, ११-२ असे सहज तीन गेम्स मध्ये पराभूत करताना आक्रमक खेळाबरोबरच नैपुण्यवान शैलीचा प्रभाव दाखविला. मुलींच्या अंतिम सामन्यात नीरजा देशमुख विजेते ठरली. तिने श्रेया कोठारी हिच्यावर ११-७,९-११,११-९,८-११,११-२ अशी मात केली. दोन्ही खेळाडूंनी या सामन्यात बहारदार खेळ केला. मात्र शेवटच्या गेम मध्ये नीरजा हिने सुरुवातीलाच घेतलेले नियंत्रण कायम ठेवले आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मुलांच्या अकरा वर्षाखालील गटात द्वितीय मानांकित नक्ष महाजन याने विजेतेपद मिळवित अनपेक्षित धक्का दिला. त्याने अंतिम लढतीत अव्वल मानांकित खेळाडू सर्वेश जोशी याला ११-९,१२-१०,९-११, १४-१२ असे रंगतदार लढतीनंतर पराभूत केले. मुलींमध्ये आहाना गोडबोले हिला विजेतेपद मिळाले. द्वितीय मानांकित गोडबोले हिने चौथ्या मानांकित शरण्या पटवर्धन हिचा ११-७,१६-१४,१२-१० असा पराभव केला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिसपटू सुमित सैगल व साधू वासवानी आंतरराष्ट्रीय प्रशालेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी साधू वासवानी मिशनचे सुधाकर विश्वनाथ हे उपस्थित होते.