पुणे, दि. ६ : राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत देशातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असून याबाबत आढावा घेण्याकरीता आलेल्या केंद्र शासनाच्या क्षयरोग पथकाने मावळ, खेड व दौंड तालुक्यातील खासगी रुग्णालये, खासगी प्रयोगशाळा, खासगी औषधविक्रेते यांना भेटी देवून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनीदेखील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक यांच्यासोबत बैठक घेतली. खासगी क्षेत्रातील क्षयरुग्ण नोंदी वाढविणे, खासगी व्यवसायीकांना कामकाजाबाबत पत्र देवून अनुदान वेळेत वितरित करावे, राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत संबंधितांनी रिक्त पदे तात्काळ भरण्याची कार्यवाही करावी आदी सूचना त्यांनी दिल्या.

